इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
सरन्यायाधीशपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर भूषण गवई हे पहिल्यांदा महाराष्ट्र दौ-यावर आले. त्यांनी चैत्यभूमी येथे भेट दिली. येथे जाण्यापूर्वी मुंबईत बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांच्यातर्फे त्यांचा सत्कार झाला. यावेळी मात्र राज्याच्या तिन्ही प्रमुख अधिका-यांची म्हणजेच मुख्य सचिव, पोलिस महासंचालक, आणि मुंबई पोलिस आयुक्त यांची अनुपस्थिती होती. या गैरहजेरीबाबत सरन्यायाधीश भूषण गवई यांनी नाराजी व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील एक व्यक्ती देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचा सरन्यायाधीश म्हणून राज्यात पहिल्यांदा येतो, तेव्हा या कार्यक्रमाला उपस्थित राहणे महाऱाष्ट्राच्या मुख्य सचिव, पोलिस महासंचालक, आणि मुंबई पोलिस आयुक्त यांना योग्य वाटत नसेल तर त्याबाबत त्यांनीच विचार केला पाहिजे.
या नाराजीनंतर तिन्ही अधिका-यांनी दिलगिरी व्यक्त केली. सरन्यायाधीशांच्या नाराजीनंतर पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला, मुंबई पोलिस आयुक्त देवेन भारती, राज्याचे मुख्य सचिव सुजाता सैनिक चैत्यभूमीवर उपस्थित झाले होते.
पण, त्यानंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अधिका-यांना खडे बोल सुनावले. त्यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेले देशाचे सरन्यायाधीश माननीय न्यायमूर्ती भूषण गवई साहेब यांच्या दौऱ्यासाठी राज्य शासनातील एकही प्रमुख अधिकारी उपस्थित राहत नाही, ही अत्यंत खेदजनक बाब आहे. न्यायमूर्ती गवई साहेब महाराष्ट्राचा अभिमान आहेत. राजशिष्टाचारातील या त्रुटी आणि त्यांचा हा अपमान महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याला शोभत नाही.