नाशिक – आज ईडीचे अधिकारी आले त्यांनी चौकशी केली, त्यांना पूर्ण सहकार्य केले अशी माहिती आज माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली. यावेळी ते म्हणाले की, परमबीर सिंहाचे यांनी केलेले आरोप खोटे आहे. त्यांना पदावरुन हटवल्यानंतर आरोप केले आहे. त्यामुळे चौकशीनंतर सर्व सत्य समोर येईल. वाझे,काझी हे परमबीर यांना रिपोर्टिंग करत होते असेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी राजकीय विषयावर बोलणे टाळले. ईडीने देशमुख यांच्या मुंबई आणि नागपुरातील निवासस्थानासह पाच ठिकाणी छापे टाकले. सायंकाळी त्यांनी तपास पूर्ण केला. त्यानंतर देशमुख यांनी पत्रकारांशी संवाद साधला..
आज सकाळी ईडीने टाकलेल्या छाप्याबाबत अतिशय गुप्तता पाळण्यात आली होती. देशमुख यांच्या वरळी येथील सुखदा या इमारतीमधील घरावर सकाळी सात वाजता ईडीच्या पथकाने छापे टाकले. तर नागपूर येथेही याचवेळेत ही कारवाई सुरु करण्यात आली. एकुण पाच ठिकाणी हे छापे टाकण्यात आले. २५ मे रोजी ईडीने नागपूर येथे देशमुख यांच्या जवळच्या तीन व्यक्तींच्या ठिकाणांवर छापे टाकले होते. या छाप्यानंतर आज य़ांच्यावर ईडीने पाच ठिकाणी हे छापे टाकले.
राजकीय वातावरणही ढवळून निघाले
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या १०० कोटी रुपयांच्या कथित वसुलीप्रकरणात देशमुख यांच्यावर आरोप केले. त्यानंतर न्यायालयाने या प्रकरणात देशमुख यांच्यावरील आरोपांची सीबीआयला चौकशी करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला. या राजीनाम्यानंतर सीबीआय व ईडीने त्यांची चौकशी सुरु केली होती. आता ईडीने छापे टाकल्यामुळे या प्रकरणाची पुन्हा चर्चा सुरु झाली आहे. या छापेमारीनंतर राजकीय वातावरणही ढवळून निघाले आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी विरोधकांच्या विरोधात राजकारण करण्यासाठी एजन्सीचा गैरवापर होत असल्याचे मी कधीही पाहिलं नाही अशी प्रतिक्रिया दिली. तर भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी अनिल देशमुखांची लवकरच जेलमध्ये रवानगी होणार असल्याचे म्हटले आहे.