मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि मंत्री नवाब मलिक यांचा जामीन अर्ज येथील विशेष न्यायालयाने फेटाळून लावला आहे. त्यामुळे उद्या 10 जून रोजी होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीत या दोघांनाही मतदान करता येणार नाही. परिणामी, महाविकास आघाडीला मोठा झटका बसला असून या दोघांची मते मिळणार नसल्याने त्यांचा चौथा उमेदवार अडचणीत आला आहे. लोकप्रतिनिधी कायद्यांतर्गत कैद्यांना मतदानाचा अधिकार नसल्याचं सांगत अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) देशमुख आणि मलिक यांच्या याचिकेला विरोध केला. तो न्यायालयाने मान्य केला आहे.
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते देशमुख आणि मलिक हे दोघेही मनी लाँड्रिंगच्या वेगवेगळ्या प्रकरणात सध्या तुरुंगात आहेत. या दोघांनी तात्पुरता जामीन मिळावा यासाठी विशेष न्यायाधीश आर.एन.रोकडे यांच्याकडे गेल्या आठवड्यात अर्ज दाखल केले होते. बुधवारी या जामीन अर्जाच्या बाजूने आणि विरोधात सर्व पक्षकारांनी युक्तिवाद पूर्ण केल्यानंतर न्यायालयाने आपला निर्णय गुरुवारसाठी राखून ठेवला होता.
यापूर्वी सुनावणीदरम्यान ईडीने जामीन अर्ज फेटाळण्यास पात्र असल्याचे सांगितले होते. देशमुख यांना ईडीने नोव्हेंबर २०२१ मध्ये अटक केली होती. “अर्जदार (देशमुख) हा विद्यमान आमदार असून, तो राज्यसभेच्या सदस्याच्या निवडणुकीसाठी इलेक्टोरल कॉलेजचा सदस्य आहे. अर्जदार आपला मतदानाचा हक्क बजावण्यास आणि मतदान करण्यास इच्छुक आहे.
राज्यसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधानसभा सदस्य नवाब मलिक व अनिल देशमुख यांना मतदानाचा हक्क बजावता येईल अशी आम्हाला अपेक्षा होती. मात्र न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे निराशा झाली असल्याची प्रतिक्रिया प्रदेशाध्यक्ष ना. @Jayant_R_Patil यांनी दिली. pic.twitter.com/J5VxGmHdUv
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) June 9, 2022
ईडीने विशेष न्यायालयाला सांगितले होते की, देशमुख हे त्यांच्याविरुद्ध दाखल झालेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणात मुख्य आरोपी असून नोव्हेंबरमध्ये अटक केल्यानंतर सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. “याशिवाय, असे दिसून आले आहे की लोकप्रतिनिधी कायद्यानुसार, कैद्यांना मतदानाचा अधिकार नाही,” असे त्यात म्हटले आहे.
ईडीच्या म्हणण्यानुसार, देशमुख यांनी राज्याचे गृहमंत्री म्हणून आपल्या पदाचा गैरवापर केला आणि काही पोलिस अधिकाऱ्यांच्या माध्यमातून शहरातील विविध बारमधून 4.70 कोटी रुपये उकळले. फरारी गुंड दाऊद इब्राहिम आणि त्याच्या साथीदारांशी संबंधित कारवायांशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात मलिकला या वर्षी 23 फेब्रुवारी रोजी ईडीने अटक केली होती.