मुंबई – सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कोठडीत माझा छळ सुरू असल्याची तक्रार माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे. देशमुख यांची ईडी कोठडी संपत असल्याने त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आले. देशमुख यांच्या ईडी कोठडीत पुन्हा वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता १५ नोव्हेंबरपर्यंत देशमुख यांना कोठडीत रहावे लागणार आहे.
देशमुख यांच्या वकीलांनी न्यायालयात आझ जोरदार युक्तीवाद केला. देशमुख यांचे वकील म्हणाले की, ज्यांनी देशमुख यांच्यावर आरोप केले ते परमबीर सिंग आज कुठे आहेत. त्यांना अटक करण्यात आलेले नाही. देशमुख चौकशीसाठी हजर झाले तर त्यांना अटक करण्यात आली. सचिव वाझे यांचे स्टेटमेंट आणि चौकशी दुसऱ्या कोठडीत असताना घेतले जाते मग देशमुख यांचे का नाही घेता येत, असे वकीलांनी ठासून सांगितले. मात्र, ईडीने तीन दिवसांच्या कोठडीची मागणी केली. आम्हाला त्यांची आता चौकशी करायची नाही तर केवळ त्यांचे स्टेटमेंट घ्यायचे आहे, असे ईडीच्या वकीलांनी न्यायालयाला सांगितले. त्यामुळे न्यायालयाने कोठडी वाढवून दिली आहे.
देशमुख यांच्या वकीलांनी सांगितले की, ईडीने मुद्दाम देशमुख यांना या प्रकरणात गोवले आणि अटक केली आहे. वाझे आणि परमबीर हे अद्यापही मोकाटच आहेत. दिवसाकाठी तब्बल ८ ते ९ तास चौकशी करुन ईडीच्या कोठडीत छळ सुरू आहे. यातून त्यांना मानसिकदृष्ट्या त्रास दिला जात आहे, असे वकीलांनी सांगितले. दरम्यान, देशमुख यांनी न्यायालयाला एक पत्र दिले आहे. त्यात म्हटले आहे की, ईडी कोठडीत मला १० पेक्षा अधिक दिवस झाले. शेकडो प्रश्न मला विचारुन झाले. सर्व प्रश्नांची मी उत्तरे दिली आहेत. आता माझ्याकडे सांगण्यासारखे काहीही राहिलेले नाही. त्यामुळे कोठडीत वाढ करु नये, अशी विनंती या पत्राद्वारे देशमुख यांनी न्यायालयाला केली.
https://twitter.com/LiveLawIndia/status/1459070075848179712