मुंबई – राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढल्या आहेत. १०० कोटी रुपयांच्या वसुलीच्या आरोप प्रकरणी न्यायालयाच्या निर्णयानुसार सध्या केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) तपास करीत आहे. याच अंतर्गत सीबीआयने देशमुख यांच्या दोन स्वीय सहायकांना समन्स बजावले आहे. या दोघांची चौकशी केली जाणार आहे. तसेच, येत्या काही दिवसात देशमुख यांचीही चौकशी होण्याची चिन्हे आहेत.
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र दिले होते. त्यात त्यांनी आरोप केला होता की देशमुख हे १०० कोटी रुपयाची खंडणी वसुलीचे टार्गेट दिल्याचे म्हटले होते. हे प्रकरण अखेर उच्च न्यायालयात गेले. न्यायालयाने या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश सीबीआयला दिले आहेत. ही चौकशी सुरू झाली आहे. त्यानुसार सीबीआयने या प्रकरणाच्या तपासाचा आराखडा तयार केला आहे. याचाच एक भाग म्हणून आता देशमुख यांच्या स्वीय सहायकांची चौकशी केली जाणार आहे. देशमुख हे खंडणी खरोखरच घेत होते का, कुणाकडून, कशा स्वरुपात, कुठे आणि कुणामार्फत घेत होते यासह अन्य प्रश्नांची उत्तरे या दोन्ही स्वीय सहायकांकडून सीबीआयचे पथक जाणून घेणार आहे. तसेच, या दोन स्वीय सहायकांची चौकशी झाल्यानंतर देशमुख यांनाही समन्स पाठवून सीबीआय चौकशीसाठी पाचारण करण्याची शक्यता आहे.