मुंबई – राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्ध कथित भ्रष्टाचाराच्या प्रकरणात केंद्रीय तपास संस्था सीबीआयने संतोष जगताप नावाच्या संशयिताला ताब्यात घेतले आहे. या हायप्रोफाइल प्रकरणातील ही पहिली अटक आहे. ठाण्यामधून संतोष जगतापला सकाळी अटक केल्याची माहिती अधिकार्यांनी दिली. संतोषविरुद्ध अटकेचे वॉरंट जारी झाल्यानंतर तो चौकशीपासून लपत होता.
अधिकारी म्हणाले, सीबीआयने ऑगस्टमध्ये कथित दलाल संतोष जगताप याच्या ठिकाणावर छापा मारून नऊ लाख रुपये जप्त केले होते. माजी मंत्री अनिल देशमुख आणि इतर अज्ञात आरोपींविरुद्ध सीबीआयने गुन्हेगारी कट रचणे आणि भ्रष्टाचार विरोधी अनिधिनियमाच्या तरतुदीअंतर्गत कपट करून अयोग्य लाभ प्राप्त करण्याच्या प्रयत्नासाठी गुन्हा दाखल केला आहे.
अनिल देशमुख यांनी माजी पोलिस अधिकारी सचिन वाझेला शहरातील बार आणि रेस्टॉरंटच्या मालकांकडून एका महिन्यात शंभर कोटी रुपयांची वसुली करण्यास सांगितले होते, असा आरोप मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमवीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून केला होता. त्यावर सीबीआयनेसुद्धा अनिल देशमुख यांच्यासह इतर अज्ञान आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.