मुंबई – माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना १३ तासाच्या चौकशीनंतर ईडीने रात्री १ वाजता अटक केली आहे. सोमवारी दुपारी बारा वाजताच्या दरम्यान देशमुख हे ईडी कार्यालयात चौकशीसाठी दाखल झाल्यानंतर त्यांची चौकशी करण्यात आली व त्यांना अटक करण्यात आली. आज सकाळी १० वाजता देशमुख यांना वैद्यकीय तपासणीसाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात येईल. त्यानंतर ११ वाजता त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. ईडी सात दिवसांची कोठडी न्यायालयात मागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. देशमुख यांच्या सोबत चौकशीसाठी गेलेले वकील इंद्रपाल हे रात्री ३ वाजताच्या दरम्यान ईडी कार्यालयामधून बाहेर पडले. त्यानंतर त्यांनी आपण या अटकेला न्यायालयात विरोध करणार असल्याचे सांगितले. देशमुख यांना पाचवेळा तर त्यांचे चिरंजीव ऋषिकेश देशमुख यांना ईडीकडून वारंवार समन्स बजावण्यात आले होते. पण, देशमुख यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांचा जबाब नोंदवला जाण्याची मागणी ईडीकडे केली आणि त्यानंतर प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे कारण देत पाचही वेळा ते ईडीसमोर आले नाहीत. त्यांनी वकिलांमार्फत ईडीला पत्र पाठवून हजर होण्यासाठी मुदत मागितली. दरम्यान देशमुख आणि त्यांच्या निकटवर्तीयांच्या ठिकाणांवर छापे टाकले गेले. यात देशमुख यांची साडेचार कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली. दरम्यान कोर्टाने त्यांची याचिका फेटाळून लावली, पण त्यांनतरही ते ईडीसमोर हजर झाले नाहीत. पण, सोमवारी ते ईडीसमोर दाखल झाले व त्यांची १३ चौकशीनंतर ईडीने त्यांना रात्री १ वाजता अटक केली. या अटकेनंतर भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी देशमुख यांना अटक झाली असून पुढील नंबर हा अनिल परब यांचा असल्याचे म्हटले आहे.