नागपूर – राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपुरातील निवासस्थानी अंमलबजावणी संचालनालयाने छापे टाकले आहे. सकाळपासून त्यांच्या घरात झाडाझडती सुरु झाली आहे. या कारवाईबाबत अतिशय गुप्तता पाळण्यात आली. देशमुख यांच्या वरळी येथील सुखदा या इमारतीमधील घरावर सकाळी सात वाजता ईडीच्या पथकाने छापे टाकले. तर नागपूर येथेही याचवेळेत ही कारवाई सुरु करण्यात आली. या कारवाईत देशमुख यांना अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान अनिल देशमुख हे दिल्लीत असल्याचे बोलले जात आहे. २५ मे रोजी ईडीने नागपूर येथे देशमुख यांच्या जवळच्या तीन व्यक्तींच्या ठिकाणांवर छापे टाकले होते. या छाप्यानंतर देशमुख य़ांच्यावर ईडी छापे टाकल्याचे बोलले जात होते.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या १०० कोटी रुपयांच्या कथित वसुलीप्रकरणात देशमुख यांच्यावर आरोप केले. त्यानंतर न्यायालयाने या प्रकरणात देशमुख यांच्यावरील आरोपांची सीबीआयला चौकशी करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला. या राजीनाम्यानंतर सीबीआय व ईडीने त्यांची चौकशी सुरु केली होती. आता ईडीने छापे टाकल्यामुळे या प्रकरणाची पुन्हा चर्चा सुरु झाली आहे. या छापेमारीनंतर राजकीय वातावरणही ढवळून निघाले आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी विरोधकांच्या विरोधात राजकारण करण्यासाठी एजन्सीचा गैरवापर होत असल्याचे मी कधीही पाहिलं नाही अशी प्रतिक्रिया दिली. तर भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी अनिल देशमुखांची लवकरच जेलमध्ये रवानगी होणार असल्याचे म्हटले आहे.