इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबईः कॅनरा बँकेने अनिल अंबानी यांच्या ‘रिलायन्स कम्युनिकेशन्स’ला आणखी एक धक्का दिला आहे. कॅनरा बँकेने रिलायन्स कम्युनिकेशन्स, रिलायन्स इन्फ्राटेल आणि रिलायन्स टेलिकॉम लिमिटेड यांना फसवणूक खाती म्हणून घोषित केले आहे. कॅनरा बँकेने रिलायन्स कम्युनिकेशनला नोटीस बजावली आहे आणि त्यांचे कर्ज खाते फसवणूक खाते म्हणून वर्गीकृत केले आहे.
दिवाळखोर दूरसंचार कंपनी ‘आरकॉम’ला पाठवलेल्या नोटीसनुसार, कॅनरा बँकेने अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कम्युनिकेशन्स (आरकॉम) आणि तिच्या सहयोगी कंपन्यांची कर्ज खाती फसवणूक म्हणून घोषित केली आहेत. असे करणारा ही चौथा कर्ज देणारी संस्था आहे. याआधी डिसेंबर २०२० मध्ये स्टेट बँक, युनियन बँक आणि इंडियन ओव्हरसीज बँकेने कंपनीची खाती फसवणूक म्हणून घोषित केली होती. २८ ऑक्टोबर रोजी कॅनरा बँकेने ‘रिलायन्स कम्युनिकेशन’ला नोटीस बजावली. कंपनीने ‘स्टॉक एक्स्चेंज’ला कळवले की त्यांना कॅनरा बँकेकडून त्यांची खाती फसवणूक म्हणून वर्गीकृत करण्याचे पत्र प्राप्त झाले आहे.
या पत्रात तीन कंपन्यांच्या लेखापरीक्षणानंतर सापडलेल्या फसवणुकीच्या पुराव्याच्या आधारे ही कर्ज खाती फसवी खाती म्हणून घोषित करण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यात असे म्हटले आहे, की ‘आरकॉम’ने केवळ रि-पेमेंटमध्येच चूक केली नाही, तर मंजुरीच्या अटींचेही उल्लंघन केले आहे. ऑडिटनुसार, रिलायन्स कम्युनिकेशन्स आणि त्याच्या उपकंपन्या -रिलायन्स टेलिकॉम आणि रिलायन्स इन्फ्राटेल यांनी एकत्रितपणे विविध बँकांकडून ३१,५८० कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. मार्च २०१७ मध्ये, कंपनीने कर्ज नॉन-परफॉर्मिंग ॲसेट म्हणून घोषित केले आणि कर्जासोबत हमीपत्रेदेखील समाविष्ट केली, जी बँकेच्या कर्ज परतफेडीच्या अटी व शर्तींचे पूर्णपणे उल्लंघन करते.
बनावट कर्जदारांना पैसे माफ केल्याबद्दल आणि विक्री बीजक निधीचा गैरवापर केल्याबद्दल बँकेने ‘आरकॉम’ आणि कंपनीलाही दोष दिला आहे. एक्सचेंज फाइलिंगमध्ये, कंपनीने म्हटले आहे, की या क्रेडिट सुविधा चालू दिवाळखोरीच्या प्रक्रियेच्या आधीच्या आहेत आणि दिवाळखोरी प्रक्रियेचा किंवा लिक्विडेशनचा भाग म्हणून निराकरण करणे आवश्यक आहे.