ग्वाल्हेर (मध्य प्रदेश) – पत्रकारितेमध्ये शिक्षण घेताना कुत्रा माणसाला चावला तर बातमी होत नाही परंतु माणूस कुत्र्याला चावला तर बातमी होते असे म्हटले जाते परंतु मध्य प्रदेशात मात्र एक अत्यंत भयानक आणि अमानुष अशी घटना घडल्याचे सांगण्यात येते. मध्य प्रदेशात एका कथित डॉक्टरने निष्पाप कुत्र्यावर चाकूने हल्ला करून त्याची हत्या केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुत्र्याने त्याच्या मुलाला चावा घेतला होता, त्यानंतर त्याने हे पाऊल उचलले. वरिष्ठ पोलीस अधिकारी राज कुबेर यांनी सांगितले की, व्हायरल व्हिडिओची दखल घेत गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू करण्यात आला आहे. यासंबंधीचा एक व्हिडिओही व्हायरल होत आहे. हे प्रकरण ग्वाल्हेरच्या डबरा भागातील आहे.
मध्य प्रदेश राज्यातील ग्वालियरच्या डबरात कुत्र्याबरोबर झालेल्या क्रूरतेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओत एक व्यक्ती चाकूने कुत्र्याचे तुकडे करीत असल्याचे दिसत आहे. माहितीनुसार यातील दिसत असलेला व्यक्ती बनावट डाॅक्टर आहे. त्याच्या मुलाला काही दिवसांपूर्वी या कुत्र्याने चावले होते. बनावट डाॅक्टरने कुत्र्याला पकडून अगोदर मारले. नंतर चाकूने वार करुन त्याचे तुकडे-तुकडे केले.
व्हिडिओ साधारण दहा दिवसांपूर्वीचा असून तो आता व्हायरल होत आहे. दहा दिवसांपूर्वी बनावट डाॅक्टरच्या मुलाला मोकाट कुत्र्याने चावले होते. त्यानंतर तो त्या कुत्र्याचा शोध घेत होता. घटनेच्या पुढल्या दिवशी त्याला सदरील कुत्रा दिसला. त्याने कुत्र्याला पकडले आणि त्याला मारायला सुरुवात केली.
गावकऱ्यांनी बनावट डाॅक्टरच्या क्रूरतेचा व्हिडिओ बनवून व्हायरल केला. आता त्याच्याविरुद्ध कारवाई करण्याची मागणी होत आहे. याप्रकरणी श्वानप्रेमी छाया तोमर यांनी ही घटना अत्यंत निंदनीय असल्याचे म्हटले आहे. असा क्रूरपणा दाखविणाऱ्या डॉक्टरवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. छाया तोमर यांनी सांगितले की, ती लवकरच त्यांच्या संस्थेशी संपर्क साधून याप्रकरणी तक्रार करणार आहे.