मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मागण्याबाबत शासन सकारात्मक आहे. अंगणवाडी सेविकांच्या मानधनात 20 टक्के तर मदतनीस यांच्या मानधनात 10 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी विधानसभेत सांगितले.
राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधनात वाढ करण्याबाबतचा प्रश्न विरोधी पक्षनेते अजित पवार, सदस्य सर्वश्री कुणाल पाटील, बाळासाहेब थोरात, धनंजय मुंडे, अतुल भातखळकर, आदिती तटकरे यांनी उपस्थित केला होता.
मंत्री श्री. लोढा म्हणाले की, अंगणवाड्यांमधील रिक्त पदांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तसेच नवीन मोबाईल खरेदीही करण्यात येत आहे. या मोबाईल ॲप मध्ये ‘ट्रॅक ॲप’ आहे त्यामध्ये माहिती अद्ययावत करत असताना नाव इंग्रजीत भरले असले, तरीही उर्वरित सर्व माहिती मराठीमध्ये भरण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असेही मंत्री श्री. लोढा यांनी सांगितले.
विधीमंडळ सभागृहातील शंभर आमदार अंगणवाडी सेविका व मदतनीसांना मानधन वाढवून देण्याबाबत प्रश्न विचारत आहेत इतका गंभीर प्रश्न असताना संबंधित बालविकासमंत्री मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सांगणार आहेत असे बोलत असतील तर या मंत्र्यांना इथे उत्तर देण्याचा काय अधिकार आहे असा थेट सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला.
अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या मानधन वाढीचा प्रश्न सभागृहात आमदार पोटतिडकीने विचारात असताना बालविकास मंत्री समाधानकारक उत्तर देत नसल्याने विरोधी आमदार आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. राज्यातील अंगणवाडी सेविकांना १५ हजार रुपये मानधन आणि मदतनीसांना १० हजार रुपये मानधन देणार का? असा सवालही अजित पवार यांनी मंत्र्यांना केला. दरम्यान अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या प्रश्नावर योग्य ते व समाधानकारक उत्तर बालविकास मंत्री लोढा यांनी न दिल्याने विरोधकांनी सभात्याग केला.
मानधन वाढ ही तात्पुरती उपाययोजना आहे, सर्वोच्च न्यायालयाने एप्रिल 2022 मध्ये दिलेल्या निवाड्यानुसार अंगणवाडी कर्मचारी वैधानिक पदावर असून, त्यांना किमान वेतन देण्याची मागणी यावेळी उपस्थित केली. राज्य सरकारच्या वतीने समाधानकारक उत्तर न आल्याने सभात्याग केला. @NCPspeaks pic.twitter.com/r3ydyZOW8t
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) March 3, 2023
AnganwadiSewika Demands Assembly Session MLA Aggressive