मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यातील आदर्श व स्मार्ट अंगणवाड्या आता अधिक स्मार्ट, बोलक्या आणि दर्जेदार होणार आहेत. त्यांचा कायापालट होण्यासाठी आणि आदर्श अंगणवाड्यांच्या विकासासाठी महिला व बालविकास विभागाने लाइटहाऊस लर्निंगसोबत सामंजस्य करार केला आहे. त्यामुळे आदर्श अंगणवाड्यांना अद्ययावत करून त्या अधिक अधिक स्मार्ट, बोलक्या आणि दर्जेदार करण्याचे महिला व बाल विकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांनी सांगितले आहे.
राज्याच्या आदर्श अंगणवाडी प्रकल्पासाठी प्रायोगिक तत्वावर मुंबईतील काही अंगणवाड्या घेऊन त्या आदर्श अंगणवाडी संकल्पनेनुसार विकसीत करण्याची जबाबदारी लाईटहाऊस लर्निंगने या संस्थेनी स्वीकारली आहे. स्मार्ट अंगणवाड्याच्या विकासासाठी लाइटहाऊस लर्निंगसोबत सामंजस्य करार केल्यामुळे लहान मुलांच्या शिक्षणाला यामुळे मदत होणार असून महाराष्ट्रातील सर्व अंगणवाड्या दर्जेदार करण्याचा शासनाचा मानस आहे, असे महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी सांगितले.
महिला आणि बाल विकास विभाग व लाईटहाऊस लर्निंग या संस्थेसोबत आदर्श अंगणवाड्यांच्या विकासासाठी सामंजस्य करार आज करण्यात आला. यावेळी महिला व बालविकास विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती आय. ए. कुंदन, एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्त रूबल अग्रवाल, एकात्मिक बाल विकास सेवा योजना उपायुक्त राजेश क्षीरसागर, लाईटहाऊस लर्निंग संस्थेचे सहसंस्थापक प्रजोद राजन, लाईटहाऊस लर्निंग संस्थेचे के व्ही एस. शेषशाही, तुषार श्रोत्री, अनिता मदान, शैलेश सिंह आदि उपस्थित होते.
मंत्री ॲड. ठाकूर म्हणाल्या, लाईटहाऊस लर्निंग ही शैक्षणिक संस्था महाराष्ट्रातील महिला व बाल विकास विभागाकडील काही अंगणवाड्या अद्ययावत सोयी सुविधांनी विकसीत करून त्यांचे सुशोभीकरण करणार आहेत. प्रायोगिक तत्त्वावर सुरु होत असलेल्या ह्या अंगणवाड्या कुलाबा, मालाड (मालवणी), गोरेगाव (प), शिवाजीनगर व मानखुर्द येथील आहेत. लाईटहाऊस लर्निंगद्वारे 200 पेक्षा जास्त अंगणवाड्याची पुनर्बांधणी करण्यात येणार आहे. तसेच अमरावती येथील जिल्हा परिषद शाळामध्येही हा पॅटर्न प्रायोगिक तत्वावर राबविण्यात येणार असून नंतर तो राज्यात राबविण्यात येणार आहे.
लाईटहाऊस लर्निंगचे सहसंस्थापक प्रजोध राजन ह्या प्रकल्पाबाबत म्हणाले, आमच्या शाळांमध्ये शैक्षणिक व शिक्षणेत्तर उपक्रम यांत योग्य समतोल साधून मुलांना संतुलीत अभ्यासक्रम शिकवला जातो. आमच्या जितक्या पूर्वप्राथमिक शाळा आहेत तेवढ्याच अंगणवाड्या आम्ही विकसीत करणार आहेत. अंगणवाडी सेविकांनाही आमच्या शिक्षिकांच्या सोबत नियमित प्रशिक्षण दिले जाईल, जेणेकरून त्या अंगणवाडीतील बालकांचे योग्य संगोपन करू शकतील वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत बालकांची मानसिक वाढ सर्वोत्तम होते. त्या दृष्टीने त्यांच्या शारीरिक वाढी इतकीच त्यांच्या मानसिक वाढीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. आम्ही आमच्या संस्थामार्फत ते फार जबाबदारीने करत आहोत आणि यापुढे अंगणवाडीतील बालकांसाठी देखील करण्यासाठी प्रयत्नशील आहोत.