नवी मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेली साडेपाच वर्षे राज्य शासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ केलेली नाही. मानधनात भरीव वाढ करावी, शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा, वेतनश्रेणी, ग्रॅच्युइटी, मासिक पेन्शन, मराठी भाषेत पोषण ट्रॅकर ॲप, नवीन चांगला मोबाईल आदी मागण्यांसाठी राज्यातील सुमारे दोन लाख अंगणवाडी कर्मचारी आजपासून महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या नेतृत्वाखाली बेमुदत संपावर गेल्या आहेत.
संपाच्या पहिल्या दिवशी कृती समितीची घटक असलेल्या अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या मुंबई येथील सभासदांनी एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्त कार्यालय, बेलापूर, नवी मुंबई येथे तीव्र निदर्शने केली. त्यात सुमारे २५० कर्मचारी सहभागी झाल्या.
आयसीडीएस आयुक्त श्रीमती रुबल अग्रवाल यांना निवेदन देण्यात आले आणि चर्चा करण्यात आली. त्यांनी कारवाई करण्याची धमकी दिली. परंतु शिष्टमंडळातील प्रतिनिधींनी ठामपणे भूमिका घेत अंगणवाडी कर्मचारी घाबरणार नसल्याचे स्पष्ट सांगितले. उच्च पदस्थ अधिकाऱ्यांच्या घटना विरोधी वक्तव्याचा सभेत निषेध करण्यात आला.
निदर्शनांच्या वेळी झालेल्या सभेला राज्य अध्यक्ष शुभा शमीम, कोषाध्यक्ष आरमायटी इराणी, कार्याध्यक्ष संगीता कांबळे, मुंबईच्या अध्यक्षा स्नेहा सावंत, मीना मोहिते, संपदा सैद आदींनी संबोधित केले.
Anganwadi Sewika Strike Agitation Started