नवी मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यातील हजारो अंगणवाडी कर्मचारी येत्या २० फेब्रुवारीपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. तशी घोषणा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने केली आहे. विविध मागण्या मान्य होत नसल्याने संपाचा निर्णय घ्यावा लागल्याचे समितीने सांगितले आहे.
समितीने दिलेल्या माहितीनुसार, आज रोजी एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्त श्रीमती रुबल अग्रवाल यांनी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या प्रतिनिधींसोबत प्रशासकीय पातळीवरील प्रश्नांबाबत बैठक आयोजित केली होती. कृती समितीच्या वतीने या बैठकीत एम ए पाटील, शुभा शमीम, दिलीप उटाणे, भगवानराव देशमुख, कलावती पोटकुले, संगीता कांबळे व राजेश सिंग यांनी भाग घेतला. आयुक्तालयाच्या वतीने स्वतः आयुक्त व काही अधिकारी उपस्थित होते.
उपरोक्त बैठकीत थकित सेवासमाप्ती लाभ, मासिक पेन्शन, नवीन मोबाईल, पदोन्नती बाबतचे निकष, आहार, इंधन, प्रवास व बैठक भत्ता, सीबीई, मोबाईल रिचार्ज इत्यादींची थकित देयके अदा करणे, उन्हाळ्याच्या सुट्ट्या, वाढलेल्या लोकसंख्येसाठी नवीन अंगणवाडी, मानधनामध्ये सेवेच्या कालावधी नुसार रु. ३१ व ६३ तसेच ३,४,५ % वाढ, ज्यादा पदभाराचा अतिरिक्त मेहनताना, साहित्य अंगणवाडीत पोहोच करणे, विविध विमा योजनांचा लाभ, इंधन व आहार दरात वाढ आदी विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
महानगरपालिका विभागातील मदतनिसांच्या सेविका पदी थेट नियुक्तीचे निकष बदलण्याची आपली अनेक वर्षांपासूनची मागणी आता मान्य झालेली आहे. परंतु सेविकांच्या मुख्य सेविका पदी पदोन्नतीसाठी नव्याने लावलेल्या शिक्षण व वयाबाबतच्या अटी पूर्ववत करण्यास त्यांनी असमर्थता दर्शवली. कृती समितीच्या निम्म्या मासिक पेन्शनच्या ऐवजी त्यांनी कर्मचाऱ्यांच्या वयानुसार १०० ते २५०० रुपये मासिक योगदानावर आधारित पेन्शन योजनेचा प्रस्ताव मांडला. ज्यावर सर्व बाजूंनी चर्चा विचारविनिमय केल्याशिवाय मान्यता देता येणार नसल्याचे कृती समितीने ठामपणे सांगितले. इंधन व आहार दरात वाढ करण्याचा निर्णय केंद्र शासनाच्या आधीन असल्याचे त्यांनी सांगितले. सर्व थकित देयके प्रकल्प अधिकाऱ्यांचे प्रस्ताव आल्यानंतर देण्याचे त्यांनी मान्य केले. नवीन मोबाईल व मानधन वाढीबाबत राज्याच्या बजेटमध्ये तरतूद करण्यात येणार आहे असे त्या म्हणाल्या. परंतु मानधन वाढीबाबत त्यांनी कोणतीही अधिक माहिती दिली नाही.
काही किरकोळ प्रश्न वगळता आजच्या बैठकीत फारसे काही हाती लागलेले नाही असे उपस्थित प्रतिनिधींचे मत झाले आहे. त्यामुळे संप करण्याबाबत कृती समिती ठाम असून २० फेब्रुवारी पासून राज्यातील सर्व अंगणवाडी कर्मचारी बेमुदत संपावर जातील. पहिल्या आठवड्यात सर्व जिल्ह्यांनी प्रकल्प व जिल्हा पातळीवर तीव्र आंदोलने करावीत. २७ फेब्रुवारी पासून राज्य विधानसभेचे बजेट अधिवेशन सुरू होईल. त्यानंतर कृती समितीचे मुंबई आझाद मैदानावर आंदोलन सुरू होईल. याच्या तारखा व अन्य तपशील लवकरच कळविण्यात येईल. असे कृती समितीने आपल्या सभासदांना आवाहन केले आहे. तशी माहिती समितीचे एम ए पाटील, शुभा शमीम, दिलीप उटाणे कमल परुळेकर, भगवानराव देशमुख, जीवन सुरुडे, जयश्री पाटील यांनी दिली आहे.
Anganwadi Sevika Strike from 20 February in Maharashtra