नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – संपूर्ण देशातून अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी ग्रॅजुटी लागु करा, व गुजरात हायकोर्टाचा आदेश अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्याचा आदेश लागू करा, या मागण्या घेऊन दिनांक १३ फेब्रुवारी रोजी तालकटोरा स्टेडियम नवी दिल्ली येथे आयफाच्या नेतृत्वाखाली परिषद घेण्यात आली. त्यामध्ये २५ राज्यातील अंगणवाडी सेविका मदतनीस सहभागी होऊन त्यांनी या मागणीवर शिक्का मोर्तब केले. भविष्यात या मागण्या मंजूर होईपर्यंत निकराची लढाई लढण्याचा ठराव परिषदेत मंजुर करण्यात आला. महाराष्ट्रातीलही अनेक जिल्ह्यातील प्रतीनिधी सहभागी झाल्या होत्या.
आयसीडीएसच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून अखिल भारतीय सेविका मदतनिस फेडरेशन CITU ची राष्ट्रीय परिषद तालकटोरा स्टेडियम नवी दिल्ली येथे १३ फेब्रुवारी रोजी यशस्वी पणे पार पडली. देशातून २५ राज्यातुन अंगणवाडी प्रतिनिधी या परिषदेला हजर होते, जेएनयुचेच्या प्राध्यापक व अर्थतज्ञ उत्सा पटनाईक, यांनी स्वातंत्र्य पूर्व काळ व स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरची आजची भुकमरी व बालकांचे कुपोषण यावर अभ्यासपूर्ण मांडणी करून आज स्वातंत्र्य नंतरही इंटरनेट व डिजीटल युगात भुकमरी व कुपोषणाची स्थिती भयावह असून भुकमरी मध्ये १२५ देशात भारताचा ११४ वा वा क्रमांक लागतो ही भारतीयांसाठी शर्मेची गोष्ट आहे.
मुलाचा शारीरिक, मानसिक व शैक्षणिक विकास अंगणवाडीतून साधला जात आहे, या लहान मुलांमधून उद्याचे भावी सुजाण नागरीक तयार होत असतात. या क्षेत्रात सरकारने चांगली आर्थिक गुतंवणुक करावी. देशाच्या चांगल्या भविष्यासाठी यातुन भावी डॅाक्टर, इंजिनियर, लोक नायक, पुढारी, पंतप्रधान बनणार आहेत याचे भान ठेवावे अशी मांडणी केली. केरळचे खासदार जॅान ब्रिटास, व्ही शीवदासन, व ए. के. रहीम यांनी या परिषदेला जाहीर पाठीबा व्यक्त करताना आम्ही यावर संसदेत आवाज उठवू असे आश्वासन दिले.
अंगणवाडी ताईंच्या ग्रॅजुटीसाठी सुप्रिम कोर्टापर्यंत लढाई लढलेले व गुजरात हायकोर्टातील सेविका मदतनीसांची बाजु भक्कम पणे मांडुन कायम स्वरूपी नोकरी देण्याचा आदेश मिळवण्यात यश मिळवलेले जेष्ठ कायदेतज्ज्ञ व वकील तसेच ऑल इंडिया वकील संघटनेचे राष्टीय सरचिटणीस ॲड सुरेंद्रनाथ यांचेही मार्गदर्शनपर भाषण झाले.सीटुचे राष्टीय सेक्रेटरी कॅा. तपन सेन यांनी या परिषदेचे उद्घाटन केले. आयफाच्या राष्ट्रीय अध्यक्ष काॅ. उषा राणी यांनी प्रास्ताविक केले यावेळी मंचावर सीटुच्या राष्ट्रीय अध्यक्ष कॅा. हेमलता, ऑल इडिया सेविका मदतनिस फेडरेशनच्या नेत्या शुभा शमीम सह सर्व राज्यातील राष्टीय पदाधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्राच्या वतीने कॅा. संगीता कांबळे यांनी परिषदेत मांडलेल्या ठरावाला पाठींबा दिला. महाराष्ट्रात ही या मागणीला घेऊन आंदोलन तीव्र करण्याचा मानस व्यक्त केला. राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी कॅा. ए. आर सिंधु यांनी यापुढील काळात अधिक ठाम राहुन लढा उभारण्यावर भर देऊन देशातील आलेल्या प्रतीनीधींना आगामी काळात देशव्यापी संप पुकारण्याची तयारी करा असे आवाहन करून परिषदेचा समारोप केला.