मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नंदुरबार जिल्ह्यात नदीला पूर असतानाही झाडावरुन कसरत करुन अंगणवाडी सेविका बैठकीला पोहचल्या. या घटनेनंतर हा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर करत राज्य सरकारवर टीका केली. ते म्हणाले की, महायुती’ म्हणजे राज्यावर आलेली आपत्ती!
त्यानंतर त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे की, आपले कर्तव्य बजावण्यासाठी नदीला पूर असतानाही नदीवर आडव्या झालेल्या झाडावरुन कसरत करुन ही अंगणवाडी सेविका बैठकीला जात असल्याची नंदुरबार जिल्ह्यातील चित्रफित आणि कोणत्या वस्तूंसाठी कोट्यवधी रूपये खर्च केले जातायत पाहा. ५०० कोटी खर्चून छत्री, मेगाफोन, एलईडी दिवे, आपत्ती प्रतिबंध साहित्य खरेदी करण्याचा घाट अंगणवाड्यांसाठी घातलेला नसून ‘टक्केवारी’साठी घातलेला आहे, हे उघड आहे.
अंगणवाडी सेविकांना वेळेवर मानधन देणे, त्यांच्या मानधनात वाढ करणे आणि कामाशी संबंधित अपु-या सोयीसुविधांची पुर्तता करण्याच्या मागण्या प्रलंबित असताना निवडणुकीच्या आधी टक्केवारीसाठी राज्याच्या तिजोरीवर आणखीन एक डल्ला मारण्याचे या सरकारचे प्रयत्न आहेत. ‘महायुती’ म्हणजे राज्यावर आलेली आजवरची सर्वात मोठी आपत्ती असून आगामी निवडणुकीत जनताच त्या आपत्तीचे योग्य व्यवस्थापन करेल.