नवी दिल्ली -स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत सप्टेंबर महिन्यात राबवल्या जाणाऱ्या ‘पोषण माह’ सोहळ्याचा भाग म्हणून केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री स्मृती झुबिन इराणी यांनी आज देशभरातील अंगणवाडी सेविकांना संबोधित केले. सर्वप्रथम इराणी यांनी महिला आणि मुलांचा सर्वांगीण विकास सुनिश्चित करण्याप्रति निर्धार आणि अथक प्रयत्नांबद्दल सर्व अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीसांचे आभार मानले आणि त्यांना त्यांची मते आणि सूचना पाठवण्याचे आवाहन केले ज्याचा समावेश पोषण २.० मध्ये केला जाऊ शकतो.
केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्र्यांनी सर्व अंगणवाडी सेविकांना देशातील सर्व महत्वाकांक्षी जिल्ह्यांमध्ये महिनाभर चालणाऱ्या पोषण माह दरम्यान ‘पोषणवाटिका’ (पोषण उद्याने) उभारल्या जातील हे सुनिश्चित करण्यासाठी प्रोत्साहित केले. इराणी यांनी यासंदर्भात केंद्र सरकारकडून शक्य ती सर्व मदत पुरवण्याचे आश्वासन दिले आणि सर्व अंगणवाडी सेविकांना अधिकाऱ्यांसोबत मिळून काम करण्यास सांगितले, ज्यामुळे पोषण वाटिकांना नव्याने चालना मिळेल. विशेषत: महिला आणि मुलांसाठी निरोगी आणि समृद्ध राष्ट्र सुनिश्चित करणे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कल्पना आणि ध्येय होते यावर केंद्रीय मंत्र्यांनी भर दिला आणि त्यासाठी पंतप्रधानांनी सर्व अंगणवाडी केंद्रांना अत्याधुनिक पायाभूत सुविधा आणि सहाय्य प्रदान करण्याचे निर्देश दिले आहेत. इराणी म्हणाल्या की, पोषण २.० च्या माध्यमातून अंगणवाडी केंद्रांना अधिक चांगल्या पायाभूत सुविधांद्वारे अधिक सक्षम केले जाईल आणि महिला आणि मुलांच्या पोषण विषयक गरजा पूर्ण करण्यासाठी सर्व प्रयत्न केले जातील.
सर्व अंगणवाडी सेविकांसाठी विशेष विमा योजना तयार केली जात आहे आणि त्यासाठी राज्य सरकारांना तपशील प्रदान करण्याची विनंती करण्यात आली आहे जेणेकरून विमा संरक्षण प्रदान करता येईल असे .इराणी यांनी सांगितले. समारोप करताना केंद्रीय मंत्री म्हणाल्या की, पोषण माह ही सर्व अंगणवाडी सेविकांसाठी हाती घेतलेल्या सर्व उपक्रमांद्वारे कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी आहे आणि केवळ महिना नव्हे तर संपूर्ण वर्ष अंगणवाडी सेविकांच्या अथक प्रयत्नांना मानवंदना ठरावे असे त्या म्हणाल्या.