नवी मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अंगणवाडी कर्मचाऱ्यांची अनेक प्रकारची थकित देयके त्वरीत अदा करणे व अन्य प्रश्नांबाबत अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या शिष्टमंडळाने आयसीडीएस आयुक्तालयाला भेट दिली व उपलब्ध उप आयुक्त श्री लोंढे, श्री देवरे, श्री क्षीरसागर व श्रीमती लोंढे यांची भेट घेऊन त्यांच्याशी संबंधित विषयांवर सविस्तर चर्चा केली. या चर्चेमधून अनेक प्रश्न मार्गी लागले.
गेल्या काही महिन्यांपासून अंगणवाडी कर्मचाऱ्यांची अनेक प्रकारची देयके थकित आहेत. आहार पुरवठादार महिला बचत गटांना देखील अनेक महिने आहाराचे अनुदान मिळालेले नाही. याबाबत संघटनेने दिनांक १७ एप्रिल रोजी देखील निवेदन दिलेले होते. परंतु परिस्थितीत कोणतीही सुधारणा झालेली नाही, उलट या थकित देयकांच्या यादीमध्ये दोन महिन्यांचे मानधन देखील जोडले गेले आहे. त्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे जगणे कठीण झालेले आहे त्यामुळे आज अंगणवाडी कर्मचारी संघटनेनी खालील मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. त्या मार्गी लागलेल्या मागण्यांमध्ये मार्चचे थकित मानधन २ दिवसांत तर वाढीव मानधनाहित एप्रिल महिन्याचे मानधन या महिना अखेरीपर्यंत मिळेल.
थकित सेवा समाप्ती लाभ देण्यास सुरुवात झालेली आहे. अंगणवाडीचे थकित भाडे मार्गी लागले आहे तसेच वाढीव भाडे देण्यात येईल. आहाराच्या बिलाची मार्च पर्यंतची रक्कम पाठवण्यात आली आहे. शिष्टमंडळात राज्य अध्यक्षा शुभा शमीम, कोषाध्यक्ष आरमायटी इराणी, कार्याध्यक्ष संगीता कांबळे, मुंबई अध्यक्षा स्नेहा सावंत, मीना मोहिते, विभावरी सारंगकर, सुप्रिया परब, सुप्रिया पवार, ज्योस्त्ना पोळ, आहार पुरवठादार बचतगटाच्या अरुणा रोडगे यांचा समावेश होता.
मागण्या खालील प्रमाणे
1. अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधन गेले दोन महिने थकित असून मानधन न मिळाल्यामुळे त्यांच्या उन्हाळ्याच्या सुट्टीचे नियोजन तर कोलमडून पडले आहेच परंतु त्यांच्या कुटुंबाचा दैनंदिन खर्च भागवणे देखील अशक्य झाले आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांमध्ये फार मोठी संख्या एकल पालकांची किंवा एकटीने जगणाऱ्या महिलांची आहे. त्यामुळे त्यांना त्वरीत थकित मानधन अदा करावे.
2. राज्यातील सुमारे ६०० अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधन आधार जोडणी असून देखील, पीएफएमएस प्रणालीमधून खात्यात येण्यामध्ये काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यामुळे त्यांच्या खात्यात मानधन येत नव्हते. त्यांना काही महिने प्रकल्प अधिकाऱ्यांद्वारा चेकने मानधन दिले जात होते, परंतु ही पद्धत आता पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना गेले ६ महिने मानधनापासून वंचित रहावे लागले असून त्यांचे जगणे कठीण झाले आहे. तरी त्यांच्या बाबतीतील तांत्रिक अडचणी ताबडतोब दूर कराव्यात व त्यांना थकित मानधन देण्याची पर्यायी व्यवस्था करावी. या तांत्रिक अडचणी दूर होण्यासाठी कायम स्वरूपी उपाययोजना करण्यात याव्यात.
3. नागरी भागातील अंगणवाड्यांचे भाडे सुमारे एक वर्षापासून थकित आहे. काही अंगणवाडी सेविकांनी आपल्या अल्प मानधनामधून हे भाडे घरमालकांना दिले आहे. परंतु हे सर्वांना शक्य होत नाही त्यामुळे भाडे सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ थकल्यामुळे अनेक घरमालकांनी अंगणवाड्यांचे सामान बाहेर काढले आहे. तरी सर्व थकित भाडे तातडीने अंगणवाडी सेविकांच्या खात्यावर पाठवण्यात यावे. ज्यांनी आधीच ते अदा केले असेल, त्यांना ते वळते करून घेता येईल व ज्यांनी दिले नसेल त्यांना ते घरमालकांना देता येईल. यापुढे दर महिन्याला नियमितपणे भाडे देण्यात यावे. अंगणवाडीच्या जागा अनेक कारणांमुळे सतत बदलत असतात त्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या खात्यातच भाड्याची रक्कम पाठवण्यात यावी व ती मिळाल्याची पावती घरमालकांकडून घेण्यात यावी.
4. एप्रिल २०२३ पासून अंगणवाडीच्या निकषांमध्ये केलेल्या बदलांनुसार व वाढलेल्या दराप्रमाणे हे भाडे अदा करण्याबाबत आवश्यक ती सर्व कार्यवाही करून प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी करावी.
5. अनेक ग्रामीण प्रकल्पांमध्ये दोन ते अडीच वर्षे प्रवास व बैठक भत्ता दिला गेलेला नाही. आपण आदेश दिले होते की प्रथम अंगणवाडी कर्मचाऱ्यांना हा भत्ता देण्यात यावा व त्यानंतर मुख्य सेविका व प्रकल्प अधिकाऱ्यांनी घ्यावा परंतु याचे पालन होत नाही. तरी सर्व थकित भत्ता त्वरीत अदा करण्यात यावा व यापुढे हा भत्ता किमान दर तीन महिन्यांनी नियमितपणे देण्यात यावा. अनेक नागरी प्रकल्पांची कार्यालये लांब अंतरावर आहेत, त्यांना काही कारणांसाठी कार्यालयात बोलावण्यात येते परंतु त्यांना भाडे मिळत नाही तरी ग्रामीण प्रकल्पांप्रमाणे नागरी प्रकल्पांमध्ये देखील प्रवास व बैठक भत्ता देण्यात यावा.
6. आहाराचे अनुदान नागरी प्रकल्पात ताजा गरम आहार पुरवठा करणाऱ्या बचतगटांना गेले वर्षभर देण्यात आलेले नाही. त्याचप्रमाणे ग्रामीण भागात आहार शिजवणाऱ्या मदतनिसांना इंधन भत्ता देखील अशाच प्रकारे थकित आहे. तरी बचतगटांचे आहाराचे अनुदान व मदतनिसांचा इंधन भत्ता यांच्या थकित रकमा त्वरीत अदा करण्यात याव्यात व यापुढे या रकमा दर महिन्याला नियमितपणे अदा करण्यात याव्यात.
Anganwadi Karmachari Demands ICDS Commissionrate