नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ (MUHS) नाशिक येथे सोमवारी अभाविपने पॅरामेडिकल शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा समस्या सोडविण्यासाठी आय.सी. यू आंदोलन केले. विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीमध्ये सुरक्षा रक्षकांच्या बंदोबस्ताला भेदून गनिमी काव्याच्या पद्धतीने प्रवेश करत कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली व आक्रमकरित्या विद्यार्थ्यांच्या समस्या मांडल्या. यामध्ये प्रामुख्याने शैक्षणिक अर्हतेनुसार पदभरती, पॅरामेडिकल विद्यार्थ्यांसोबत होणारा दूजाभाव, विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शिक्षक नसणे, नियमित अध्यापन न चालणे अशा विविध समस्यांना अभाविपने वाचा फोडली.
२०१३ पासून महाराष्ट्रामध्ये आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या माध्यमातून १४ विविध प्रकारचे पॅरामेडिकलचे ४ वर्षांचे पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यात आले. रुग्णसेवेकरीता राज्यातील विविध रुग्णालयांमध्ये डॉक्टरांना मदतनीस म्हणून प्रशिक्षित कर्मचारी मिळावे याकरिता या अभ्यासक्रमाची रचना करण्यात आली असली तरी देखील प्रत्यक्षात तसे होताना दिसत नाही. महाराष्ट्रातील कुठल्याही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये या विद्यार्थ्यांना नियमित अध्यापन करण्यात येत नाही, इतर वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या तुलनेत पॅरामेडिकलच्या विद्यार्थ्यांसोबत सतत दूजाभाव करण्यात येतो. कुठल्याही महाविद्यालयात या विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी स्वतंत्र शिक्षक उपलब्ध नसून स्वतंत्र वर्ग आणि वसतिगृह देखील या विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयांमध्ये नाही.
महाविद्यालयीन प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून अतिशय हीन दर्जाची वागणूक या विद्यार्थ्यांना दिली जाते. हा अभ्यासक्रम व्यवसायिक अभ्यासक्रमांच्या यादीत समाविष्ट न करण्यात आल्याने कुठलीही शिष्यवृत्ती किंवा मुलींना मोफत शिक्षणाची योजना या विद्यार्थ्यांच्या बाबतीत लागू होत नाही. याउलट पहिल्या वर्षापासूनच आध्यापन न करता विद्यार्थ्यांना रुग्णालयात सर्व महिन्यामध्ये सेवा देण्यासाठी भाग पाडले जाते. एका बाजुला मूलभूत सोयसुविधांचा अभाव असताना, विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी संघर्ष करावा लागत असताना दुसऱ्या बाजूला अभ्यासक्रमाचे शुल्क मात्र दरवर्षी वाढतच जात आहे. या आजारी पडलेल्या विद्यापीठ प्रशासनावर उपचार करण्यासाठी आय.सी.यू आंदोलन करीत अभाविपच्या कार्यकर्त्यांनी थेट रुग्णवाहिका विद्यापीठात आणली. आंदोलनात उपस्थित विद्यार्थ्यांनी आपला रोष प्रशासनापुढे मांडला.
यावेळी आरोग्य विज्ञान विद्यापीठा विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.आंदोलनाच्या दरम्यान वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी फोनवरून विद्यार्थ्यांशी संवाद करत सर्व समस्या सोडविण्यासाठी २८ जानेवारी २०२५ रोजी विद्यार्थी परिषद कार्यकर्ते, विद्यार्थी प्रतिनिधी आणि अधिकारी अशी एकत्रित बैठक करून समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. सोबतच कुलगुरू कानिटकर मॅडम यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना व्हिडिओ कॉन्फरन्स वरून संवाद करून विद्यापीठ स्तरीय सर्व प्रश्न सोडविण्यासाठी २४ जानेवारी २०२५ रोजी बैठकीचे आयोजन करण्यात येईल असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले. या आंदोलनात अभाविप पश्चिम महाराष्ट्र प्रदेश मंत्री अथर्व कुलकर्णी, प्रदेश सहमंत्री ओम मालुंजकर व मेघा शिरगावे, नाशिक महानगर सह मंत्री यश गुरव, व्यंकटेश अवसरकर, पियूषा हिंगमिरे, अक्षता देशपांडे तसेच महेंद्र भोये, अक्षय भांडलकर आदी कार्यकर्त्यांसह महाराष्ट्रातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील पॅरामेडिकल चे शिक्षण घेणारे विद्यार्थी उपस्थित होते.
आम्ही शांत बसणार नाही
गेल्या अनेक वर्षांपासून पॅरामेडिकल च्या विद्यार्थ्यांसोबत दूजाभाव करण्याचे काम महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि महाराष्ट्र शासनाने केले आहे. शैक्षणिक अर्हतेनुसार या विद्यार्थ्यांची पदभरती होत नसल्याने ४ वर्षे घेतलेले शिक्षण निष्फल ठरत आहे. कुठल्याही मूलभूत सोयीसुविधा पुरवत नसताना या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्कात मात्र झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. आमच्या मागण्या पूर्ण न झाल्यास याहीपेक्षा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल. तसेच गरज पडल्यास वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांच्या विरोधात आंदोलन केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही.
— अथर्व कुलकर्णी (प्रदेश मंत्री, अभाविप)
अभाविपच्या मागण्या पुढीलप्रमाणे आहेत –
१) ज्या महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना अध्यापन करण्यात आले नाही किंवा मूलभूत सोयीसुविधा देण्यात आल्या नाही अशा सर्व महाविद्यालयांच्या कमकागाजाची सखोल चौकशी करून दोषींवर सक्त कारवाई करण्यात यावी. तसेच असे पुन्हा होऊ नये यासाठी उपाययोजना कराव्या.
२) संपूर्ण अभ्यासक्रमाची पुनर्रचना करून तो अद्ययावत करण्यात यावा.परिक्षेकरीता विशिष्ट अभ्यासक्रम देखील निश्चित करण्यात यावा तसेच अभ्यासक्रमाचे नाव काही ठिकाणी BPMT (Bachelor in Paramedical Technology) असे असून काही ठिकाणी BSC in Paramedical Technology असे आहे, हा संभ्रम दूर करून Bachelor in Paramedical Technology हेच नाव सर्वत्र असावे.
३) इतर वैद्यकीय अभ्यासक्रमांप्रमाणे पॅरामेडिकल साठी वर्षभराचे अध्यापनाचा आणि रुग्णालयात काम करण्यासाठीचा वेळ निश्चित करण्यात यावा. परीक्षेपूर्वी तयारीसाठी विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ देण्यात यावा.
४) BPMT या पदवी अभ्यासक्रमानंतर पदव्युत्तर पदवीचा अभ्यासक्रम विद्यापीठाने सुरू करावा जेणेकरून विद्यार्थ्यांना अधिक व सखोल ज्ञान घेता येईल.
५) BPMT चे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शासकीय महाविद्यालयांच्या वसतीगृहामध्ये विशिष्ट जागा आरक्षित ठेवण्यात याव्या. अन्यथा स्वतंत्र वसतिगृहांची तरतूद करण्यात यावी.
६) प्रत्येक महाविद्यालयामध्ये इतर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांप्रमाणे संघटना स्थापन करण्याची परवानगी देण्यासाठी महाविद्यालयांना निर्देश देण्यात यावे.
७) व्यक्तिमत्व विकासाकरिता पॅरामेडिकलच्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र कार्यक्रम प्रत्येक महाविद्यालयाच्या माध्यमातून राबविण्यात यावे यासाठी विद्यापीठाने पुढाकार घ्यावा.
८) दरवर्षी अभ्यासक्रमाचे शुल्क वाढत असून यावर नियंत्रण आणणे गरजेचे आहे. शुल्कवाढीच्या तुलनेत विद्यार्थ्यांना सोयीसुविधा पुरविण्यात याव्या.
९) विद्यापीठाने तक्रार निवारण पोर्टल सक्षम करून विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारच्या समस्या आल्यास तक्रार करण्यासाठी प्रोत्साहन करावे तसेच या समस्या वेळेत सोडविण्यासाठी योग्य त्या उपययोजना कराव्या.
१०) महाविद्यालयातील प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून पॅरामेडिकल शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत जो भेदभाव किंवा दूजाभाव केला जातो ती तत्काळ थांबिण्याचे निर्देश महाविद्यालयांना द्यावे व यापुढे असे घडल्याचे निदर्शनास आल्यास तत्काळ कारवाई करावी.
पॅरामेडिकल विद्यार्थ्यांच्या संदर्भात शासनाकडे करण्यात आलेल्या मागण्या –
१) शैक्षणिक अर्हतेनुसार पदभरती करण्याचे आदेश सर्व शासकीय आणि खासगी रुग्णालयांना देण्यात यावे जेणेकरून प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची भरती होईल व सर्व सामान्य रुग्णांची योग्य ती काळजी घेतली जाईल.
२) BPMT च्या अभयासक्रमाबरोबर पदव्युत्तर पदवीचा अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी शासन स्तरावरून प्रयत्न करण्यात यावे.
३) वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये रिक्त असलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या जागा लवकरात लवकर भरण्यात याव्या.
४) पॅरामेडिकल अभ्यासक्रमास इतर वैद्यकीय आणि नर्सिंग अभ्यासक्रमा प्रमाणे व्यवसायिक अभ्यासक्रमाचा दर्जा देऊन सर्व शिष्यवृत्ती योजना आणि मुलींना मोफत शिक्षणाची योजना या विद्यार्थ्यांसाठी देखील सुरू करण्यात यावी.
५) पॅरामेडिकल अभ्यासक्रमाचा दर्जा वाढविण्यासाठी राज्यातील सर्व महाविद्यालयांमधील या अभ्यासक्रमाचे प्रवेश CET Cell च्या माध्यमातून केंद्रीय पद्धतीने करण्यात यावे.
६) महाराष्ट्र राज्यामध्ये आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी पॅरामेडिकल फोर्सची स्थापना करण्यात यावी. तसेच पॅरामेडिकलच्या विद्यार्थ्यांना यामध्ये स्थान देण्यात यावे.