मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बदलापूरमधील चिमुकलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेचा निषेध म्हणून महाराष्ट्र बंदचे महाविकास आघाडीने आवाहन केले होते. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने न्यायालयाच्या निर्देशानंतर महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंद मागे घेतला असला तरी उध्दव ठाकरे यांनी राज्यभर काळ्या फिती लावत आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले. उध्दव ठाकरे तोंडाला काळी पट्टी बांधून शिवसेना भवनाजवळ बसणार आहे.
शुक्रवारी सायंकाळी पत्रकार परिषद घेत उध्दव ठाकरे यांनी उद्या महाविकास आघाडीचे नेते काळ्या फिती लावून निषेध करणार आहे. मी तोंडाला काळी पट्टी बांधून शिवसेना भवनाजवळ बसणार आहे. माझं रक्षण करण्यासाठी कोणी येत नाही असं लोकांना वाटतं, तेव्हा लोक रस्त्यावर उतरतात. बांगलादेशात ते आपण पाहिलं. आपल्या देशात तशी परिस्थिती होऊ नये म्हणून आमचे प्रयत्न आहेत. आमचं आंदोलन थांबणार नाही, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
बदलापूरच्या केसवर आता कोर्ट फास्ट ट्रॅक काय असतं ते दाखवेल अशी आशा आहे. काल कोर्टाने जे थोबडवलं ते मुख्यमंत्री आणि सरकारला चपराक नाही का. आताही मी कौतुक करत आहे. न्यायालयाच्या भूमिकेचं कौतुक आहे. न्यायालय हे तत्परतेने हलू शकतं. तीच तत्परता त्यांनी ज्या कारणासाठी आंदोलन करणार होतो त्यावर दाखवली पाहिजे. आरोपींना शिक्षा सुनावली पाहिजे. सरकार नराधमांना पाठीशी घालवत आहे. उत्स्फूर्तपणे आंदोलन करणाऱ्यांना गुन्हेगार ठरवलं जात आहे. ते स्वतच्या विश्वात मश्गुल आहेत. त्यामुळेच आम्ही आंदोलन करणार आहोत. लोकांना जागरूक करत असल्याचं ठाकरे यांनी सांगितले.