नाशिक – नाशिक जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाच्या वतीने सोमवार २८ जून पासून शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. कार्यालयीन अधीक्षक सुधीर पगार यांना याबाबत त्यांनी माहिती दिली. याप्रसंगी जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष गुलाबराव भामरे, कार्याध्यक्ष साहेबराव कुटे, कार्यवाह आर. डी. निकम, निलेश ठाकूर, जयेश सावंत त्र्यंबक मार्तंड, राजेंद्र शेळके, मधुकर भांडारकर आदी उपस्थित होते.
या उपोषणाबाबत संघटनेच्या पदाधिका-यांनी सांगितले की, शिक्षकांच्या विविध तक्रारी अडचणी व मागण्यांसंदर्भात गेल्या महिनाभरापासून शिक्षण उपसंचालक वेतन पथक कार्यालय व शिक्षणाधिकारी कार्यालय यांच्यासमोर विविध आंदोलने करूनही शिक्षकांची प्रश्न मार्गी लागत नाहीत. गेल्या मार्च महिन्यापासून जिल्ह्यातील शिक्षकांच्या वेतनाचा खेळखंडोबा झालेला आहे. यासंदर्भात शिक्षण उपसंचालक कार्यालय वेतन पथक कार्यालय व शिक्षणाधिकारी कार्यालय यांच्यात विविध प्रकारची आंदोलने करण्यात आले शिक्षणाधिकारी त्यांच्या कार्यालयात थांबत नाहीत सह्या करत नाहीत, वर्षानुवर्षे पदोन्नतीचे वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणीची प्रकरणे प्रलंबित आहेत, वेतनाच्या बिलावर सह्या करण्यासाठीसुद्धा तीन-तीन चार-चार दिवस शिक्षणाधिकाऱ्यांना वेळ मिळत नाही. गेल्या अनेक वर्षापासून कर्मचाऱ्यांना फंडाच्या स्लिपा मिळालेल्या नाहीत. डीसीपीएस एनपीएस धारकांचा हिशेब मिळालेला नाही. मेडिकल बिले व पुरवणी बिल यांचाही असाच अनेक वर्षांचा गोंधळ सुरू आहे. वेतन पथक अधीक्षक उदय देवरे हे कार्यालयात थांबत नाहीत, त्यांच्या कार्यालयात येणाऱ्या मुख्याध्यापक शिक्षक व लिपिकांशी ते उद्धट वर्तणूक करतात, त्यांना नाशिक जिल्ह्यात अनेक वर्ष झाले असून त्यांची जिल्ह्याच्या बाहेर तात्काळ बदली करण्यात यावी अशी मागणी सुध्दा करण्यात आली. त्याचप्रमाणे हे अधिकारी शिक्षणाधिकारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे फोन घेत नाहीत,किरकोळ किरकोळ कामांसाठी शिक्षणाधिकारी कार्यालयात व वेतन पथक कार्यालयात कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक पिळवणूक करण्यात येते, पैसे घेतल्याशिवाय फाईल हलत नाहीत, शिक्षण उपसंचालकांच्या आदेशाला देखील वेतन पथक अधीक्षक व शिक्षणाधिकारी ही केराची टोपली दाखवतात हे सर्व आता सहन करण्याच्या पलिकडे गेले म्हणून आंदोलनाचा मार्ग स्विकारला आहे.