इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – एखाद्या वस्तूचे किंवा भाज्या तथा फळांचे भाव वाढले की, देशभरात त्याची चर्चा सुरू असते. सध्या टोमॅटोच्या भावाने किलोमागे शंभरी नव्हे तर त्याच्या दुपटीने दोनशे रुपये दर गाठला आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहक टोमॅटो खरेदी करू शकत नाही. तरीही टोमॅटोला चांगली मागणी असल्याने ज्या शेतकऱ्यांकडे टोमॅटो आहे. ते मात्र मालामाल होत असून जणू काही त्यांची लॉटरी लागली आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा आणि आता आंध्र प्रदेशातील काही शेतकऱ्यांनी यातून कोट्यावधीचा नफा मिळवल्याने आता देशभरात त्याची चर्चा सुरू आहे. कारण आंध्र प्रदेशातील एका शेतकऱ्याचे टोमॅटो विक्रीतून तब्बल ४ कोटी रुपये कमावले आहेत.
जणू चार महिने आधीच दिवाळी
काही शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये टोमॅटोचे उत्पादन घेतले, त्यांची मात्र तीन -चार महिने आधीच दिवाळी साजरी झाली आहे. टोमॅटोचा भाव वाढल्यामुळे हे शेतकरी चक्क मालामाल झाले आहेत. दोन महिन्यापूर्वी बाजारात टोमॅटोची आवक घटल्याने दरामध्ये प्रचंड वाढ झाली, त्यामुळे टोमॅटोचे भाव जणू काही गगनाला भिडले, शंभर ते दीडशे रुपये दराने टोमॅटो विकल्या गेले, काही ठिकाणी तर हा दर दोनशे रुपये इतका होता. आपल्या राज्यात जुन्नरमध्ये तुकाराम गायकर या शेतकऱ्याने गेल्या महिन्याभरात फक्त टोमॅटोच्या विक्रीतून सुमारे दीड कोटींचा नफा कमावल्याचे दिसून आले आहे. सिन्नर तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी देखील कोट्यावधीचा नफा झाल्याने त्यांचे महामार्गावर बॅनर झळकत आहेत. तर तिकडे टोमॅटोमुळे आंध्र प्रदेशातील एका शेतकऱ्याचे नशीब बदलले आहे. टोमॅटो विक्रीतून चक्क ४ कोटी रुपये कमावले आहे. यापूर्वी, तेलंगणातील मेडक जिल्ह्यातील शेतकरी बन्सुवाडा महिपाल यांनी एका महिन्यात टोमॅटो विकून दोन कोटी रुपये कमवले होते.
३ कोटी रुपयांचा नफा
आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातील शेतकरी चंद्रमौली आणि त्यांच्या पत्नीने एप्रिलमध्ये करकमंडला गावात २२ एकर जमिनीवर टोमॅटोची लागवड केली होती. त्यांना टोमॅटो विकून अवघ्या दिड महिन्यात ४ कोटी रुपये कमावले. टोमॅटोने या शेतकऱ्याचे जीवनमानच बदलले असून सध्या तो कोट्यवधीचा मालक झाला आहे. कारण टोमॅटो विकून त्याला ३ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. टोमॅटोला भाव जास्त असताना शेतकरी चंद्रमौली यांनी मदनपल्ले मार्केटमध्ये तसेच शेजारच्या कर्नाटक राज्यात टोमॅटोचा माल पाठवला होता. १५ ऑगस्टनंतर टोमॅटोच्या दरात काही प्रमाणात घट येऊ शकते. मात्र, तेव्हासुद्धा टोमॅटोला सुमारे ७० रुपयांचा दर राहू शकतो सप्टेंबरमध्येही टोमॅटोचे दर खूप कमी राहतील, वास्तविक टोमॅटो हे नाशवंत पीक असल्याने त्याचा शेतकऱ्यांना दरवर्षीच फारसा फायदा होत नाही, २५ वर्षातून एखादयावेळी असे घडू शकते, असे काही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, चंद्रमौली या शेतकऱ्याने याबाबत सांगितले की, टोमॅटोच्या उत्पादनातून एवढी कमाई होईल असे आम्हाला कधीच वाटले नव्हते. नफ्यातील काही भाग फलोत्पादन उपक्रमांचा विस्तार करण्यासाठी गुंतवण्याचा या शेतकऱ्यांची योजना आहे.
andhra pradesh farmer tomato crore profit
agriculture production money