इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – पती-पत्नीमध्ये काही कारणाने वाद होतात, हे वाद विकोपास गेल्यास ते घटस्फोट घेऊन वेगळे होतात. घटस्फोटानंतर तो दुसरे लग्न करतो, परंतु पहिल्या पत्नी बरोबर त्याचे मानसिक किंवा शारीरिक संबंध असल्याचे सोशल मीडियामुळे उघड होते. असाच एक प्रकार घडला आहे. एक व्यक्ती त्याच्या पहिल्या पत्नीशी सोशल मिडियाद्वारे कनेक्ट होता. यामुळे दुसऱ्या पत्नीचा संताप झाला. याच संतापात पत्नीने पतीचे गुप्तांगच कापून टाकले आहे. या पतीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आंध्र प्रदेशातील एनटीआर जिल्ह्यात ही घटना घडली आहे.
रागाच्या भरात चालवले ब्लेड
पोलिसांकडून दिलेल्या माहितीनुसार, एनटीआर जिल्ह्यातील माप्ला गावात राहणाऱ्या २६ वर्षीय आनंद बाबू नामक युवकाचे ६ वर्षांपूर्वी लग्न झाले होते. काही दिवस त्याचे पत्नीशी प्रेमाचे संबंध होते. नंतर मात्र दोघांमध्ये वाद आणि भांडण होऊ लागले. परंतु वारंवार भांडण झाल्याने त्याने पत्नीपासून घटस्फोट घेतला. त्यानंतर त्याने ४ वर्षांपूर्वी वरम्मा नावाच्या महिलेशी लग्न केले. तेव्हापासून दोघेही पती पत्नी रोजंदारी मजूर म्हणून काम करून आपला उदरनिर्वाह करतात. कामावर जाण्यापुर्वी आणि काम करून घरी आल्यावर हा तरूण मोबाईल बघत असे. पत्नीने काहीही सांगितले तर तो त्याकडे लक्ष देत नव्हता. एके दिवशी त्याने मोबाईलवर पहिल्या पत्नीचा इन्स्टाग्राम रील पाहिला. त्यामुळे दुसरी पत्नी वरम्मा चिडली. रागाच्या भरात तिने पतीवर ब्लेडने हल्ला केला.
नेमकं काय घडलं
सकाळी आपल्याला कामावर जायला उशीर होतो. मोबाईल बघू नका, असे पत्नी वरम्मा ही पती आनंद बाबूला सांगत होती. तरीही तो मोबाईलमध्ये व्यस्त होता. अखेर तिने जवळ जाऊन पाहिले असता आनंद हा पहिल्या पत्नीचे इन्स्टाग्राम रील्स पाहत असल्याचे तिला दिसले. त्यामुळे वरम्माच्या रागाचा पारा चढला. यानंतर पती-पत्नीमध्ये जोरदार वाद सुरू झाला. वादाचे रूपांतर चक्क हाणामारीत झाले. संतापलेल्या वरम्माने पतीवर ब्लेडने वार सुरू केले. संतापाच्या भरात वरम्माने पतीचे गुप्तांगच कापले. त्यामुळे पतीला गंभीर दुखापत झाली. त्याने आरडाओरडा केला. त्याचवेळी शेजारीपाजारी धावून आले.
प्रकृती स्थिर
आनंदबाबूच्या शरीरातून रक्ताच्या धारा वाहत होत्या. ते पाहून शेजारच्या लोकांनी धक्काच बसला. नेमके काय घडले कोणालाच कळेना. शेजाऱ्यांनीच तातडीने त्याला प्राथमिक उपचारार्थ सरकारी रुग्णालयात दाखल केले. अधिक उपचारासाठी त्याला विजयवाडा येथे नेण्यात आले. आनंदच्या गुप्तांगाला खोल जखम झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. मात्र सध्या आनंद बाबूची प्रकृत्ती स्थिर असल्याचे सांगण्यात येते.