इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – आंध्र प्रदेशमध्ये २०२४ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. राज्य मंत्रिमंडळाची पुनर्रचना करण्याच्या उद्देशाने आंध्र प्रदेश सरकारच्या सर्वच मंत्र्यांनी तत्काळ राजीनामा दिला आहे. अखेरची कॅबिनेट बैठक संपल्यानंतर २४ कॅबिनेट मंत्र्यांनी आंध्र प्रदेश सचिवालयात मुख्यमंत्री वाय. एस. जगन मोहन रेड्डी यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला आहे.
मुख्यमंत्री वाय. एस. जगन मोहन रेड्डी कॅबिनेटमध्ये फेरबदल करण्यासाठी पूर्णपणे सज्ज झाले आहेत. सध्याच्या कॅबिनेटमधून १९ मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे. काही दिवसांतच राज्य मंत्रिमंडळात नव्या मंत्र्यांचा समावेश होण्याची शक्यता आहे. ९ एप्रिल रोजी शपथविधी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सध्याच्या मंत्रिमंडळातील चार मंत्री कायम राहण्याची शक्यता आहे. ९ एप्रिलपूर्वी मुख्यमंत्री रेड्डी नव्या मंत्र्यांची अंतिम यादी राज्यपाल विश्वभूषण हरिचंद्रन यांच्याकडे सुपूर्द करणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. मुख्यमंत्री रेड्डी यांनी कॅबिनेटमधून हटविण्यात आलेल्या १९ मंत्र्यांची यादी राज्यपालांना सुपूर्द केली आहे. सध्याच्या कॅबिनेटमध्ये पाच उपमुख्यमंत्री आहेत. राज्यातील जातीय समीकरणे संतुलित करण्याच्या रणनीती अंतर्गत पाच नवे उपमुख्यमंत्री निवडले जाण्याची शक्यता आहे.
सध्याच्या मंत्रिमंडळात पाच उपमुख्यमंत्री म्हणून अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, मागासवर्गीय, अल्पसंख्याक आणि कापू समाजांना प्रतिनिधित्व मिळाले आहे. तसेच उच्चवर्णीय जातींमधील ११ मंत्री आहेत. त्यामध्ये रेड्डी समाजाचे ४, मागासवर्गीय ७, अनुसूचित जातीचे ५ आणि अनुसूचित जमाती, मुस्लिम समाजाच्या प्रत्येकी एका मंत्र्यांचा समावेश आहे.
मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर वाय. एस. जगन मोहन रेड्डी यांनी मंत्रिमंडळाची पुनर्रचना करण्याचे संकेत दिले होते. मंत्र्यांकडून डिसेंबरमध्येच राजीनामे घेतले जाणार होते, परंतु कोविड परिस्थितीमुळे ते स्थगित करण्यात आले होते. तेलुगू नववर्ष उगादीनंतर म्हणजेच २ एप्रिल रोजी कॅबिनेटमध्ये फेरबदल करणार असल्याचे रेड्डी यांनी गेल्या महिन्यात सांगितले होते.