मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यभरात गाजत असलेल्या अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीबाबत अखेर भारतीय जनता पक्षाने मोठा निर्णय घेतला आहे. शिवसेनेच्या शिंदे गट आणि भाजप युतीच्यावतीने माजी नगरसेवक मुरजी पटेल पटेल यांनी उमेदवारी देण्यात आली. तर, शिवसेनेच्या ठाकरे गटाने दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा यांना उमेदवारी दिली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना काल खुले पत्र लिहिले. त्यात मागणी केली की भाजपने त्यांचा उमेदवार मागे घ्यावा आणि ऋतुजा लटके यांना बिनविरोध निवडून द्यावे. त्याची दखल घेत अखेर मुरजी पटेल यांची उमेदवारी मागे घेत असल्याची घोषणा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत भारतीय जनता पार्टी – बाळासाहेबांची शिवसेना – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) युतीचे उमेदवार मुरजी पटेल निवडणूक अर्ज मागे घेतील. कै. आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके या निवडणुकीत विजयी होण्यासाठी भाजपाने हा महाराष्ट्राच्या संस्कृतीनुसार निर्णय घेतला, असे बावनकुळे यांनी सांगितले.
ते म्हणाले की, अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपाची तयारी पूर्ण झालेली आहे. अपेक्षित मते मिळवून भाजपा ही निवडणूक जिंकण्याच्या स्थितीत आहे. तथापि, एखाद्या आमदाराचे निधन झाले आणि त्यांच्या परिवारातील कोणी निवडणूक लढवत असेल तर निवडणूक बिनविरोध करण्याची महाराष्ट्रात संस्कृती आहे. भाजपाने यापूर्वी अनेकदा असा निर्णय घेतला आहे. तसेच नव्याने निवडून येणाऱ्या आमदाराला जेमतेम एक दीड वर्ष कालावधी मिळणार आहे. त्यामुळे आज पक्षाने उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय केंद्रीय आणि राज्य नेतृत्वाने घेतला आहे. राज्यासाठी संवेदनशील निर्णय घेतल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांचे आपण आभार मानतो.
अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी भारतीय जनता पार्टीवर राजकीय दबाव वाढत असल्याची चर्चा असतानाच रविवारी रात्री उशिरा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी भाजपाच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. रात्री दीड तास ही बैठक झाली. या बैठकीमध्ये आशिष शेलार, अंधेरी पोटनिवडणुकीतील उमेदवार मुरजी पटेल यांच्यासहीत अनेक नेते उपस्थित होते.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी केलेलं आवाहन तसेच शिंदे गटातील आमदार प्रताप सरनाईक यांनीही यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लिहिलेलं पत्र या दिवसभरातील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजपाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये अंधेरीमधील पोटनिवडणुक हाच महत्वाचा विषय ठरला.
https://twitter.com/cbawankule/status/1581919569643335680?s=20&t=1WQYtZp61fhvGwJVlELSBw
भाजपाचे नेते निवडणूक लढवण्यावर ठाम दिसत असल्याचं या बैठकीमध्ये दिसून आलं. मात्र या निवडणुकीबद्दलचा निर्णय घेण्याचे पूर्ण अधिकार देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले. भाजपाचे स्थानिक नेतृत्व ही जागा लढवू इच्छिते असे आशिष शेलार आणि मुरजी पटेल यांनी फडणवीस यांना कळवले. बिनविरोध निवडणुकीला प्राधान्य द्यावे की निवडणूक लढवली पाहिजे यावर बराच ऊहापोह झाला. यावर आपण निवडणूक लढवली पाहिजे असा भाजपा नेत्यांचा सूर होता. तर या निवडणुकीसंदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी निर्णय घ्यावा असं निश्चित करण्यात आले. अखेर निवडणूक अर्ज मागे घेण्यासंदर्भात भाजपने घोषणा केली आहे. तशी माहिती प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी दिली आहे.
भाजपची सावध भूमिका
अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी राज ठाकरे यांनी केलेल्या आवाहनावर गांभीर्याने विचार करण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्याने भाजपाने सावध भूमिका घेतली. अंधेरीत शिवसेनेचा विजय झाल्यास त्याचा आगामी मुंबई पालिका निवडणुकीवर परिणाम होऊ शकतो. यामुळे शिवसेनेचे नैतिक बळ तर वाढेलच पण मतदारांमध्ये शिवसेनेबद्दल आपुलकीची भावना निर्माण होऊ शकते. भाजपला हे टाळायचे आहे. शिवाय, अंधेरीत यशाबद्दल भाजपाचे नेते साशंकच आहेत. यामुळेच अंधेरीबाबत भाजपामध्ये वेगळा मतप्रवाह असल्याचे समजते.
निवडणूक होणार की नाही
भाजपच्या उमेदवाराने माघार घेतली असली तरी अद्याप ऋतुजा यांचा बिनविरोधचा मार्ग मोकळा झालेला नाही. कारण, अपक्ष आणि अ्य लहान पक्षाच्या उमेदवारांनी अर्ज भरला आहे. या सर्वांनीच माघार घेतली तर ऋतुजा यांची बिनविरोध निवड होणार आहे. जर, एका उमेदवाराने जरी अर्ज कायम ठेवला तर येथे निवडणूक होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
https://twitter.com/ANI/status/1581909279627702273?s=20&t=1WQYtZp61fhvGwJVlELSBw
Andheri Bypoll Election BJP Big Decision
Murji Patel Candidature Withdraw Rutuja Latke