मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी आज सुरू आहे. मात्र, या निवडणुकीत सध्या नोटा ( म्हणजेच नन ऑफ द अबव्ह, वरीलपैकी एकही नाही). निवडणुकीत जे उमेदवार उभे आहेत त्यांच्यापैकी एकही उमेदवार जर पसंत नसेल तर मतदार नोटाला मत देऊ शकतात. नोटाचा पर्याय हा केवळ याच निवडणुकीत नाही तर तो दरवेळी असतो तरीही यंदा त्याची एवढी चर्चा का होते. कारण, त्यामागे मोठे राजकारण आहे.
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक जाहीर झाल्यापासूनच प्रचंड चर्चेत आहे. शिवसेनेचे दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर या जागेवर ही पोटनिवडणूक होत आहे. ही निवडणूक जाहीर होण्यापूर्वी शिवसेनेत मोठी फूट पडली. ठाकरे गट आणि शिंदे गट निर्माण झाले. ठाकरे गटाने दिवंगत रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी जाहीर केली. पण, ऋतुजा या मुंबई महापालिकेत नोकरी करीत होत्या. निवडणूक लढविण्यासाठी त्यांना महापालिकेतील नोकरीचा राजीनामा देणे आवश्यक होते. त्यांनी तो दिला. पण, महापालिकेकडून तो स्विकारण्यात आला नाही. अखेर हे प्रकरण थेट मुंबई उच्च न्यायालयात गेले. तेव्हा न्यायालयाने महापालिकेला आदेश दिले की त्यांनी राजीनामा मंजूर करावा. त्यानंतर शेवटच्या दिवशी ऋतुजा यांनी उमेदवारी अर्ज सादर केला.
शिवसेनेतून बंडखोरी करणाऱ्या शिंदे गटाने मात्र उमेदवार दिला नाही. त्यांनी त्यांचा मित्र पक्ष असलेल्या भाजपला पाठिंबा दिला. भाजपने मुरजी पटेल यांना उमेदवारी दिली. त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप नेत्यांना पत्र लिहिले. त्यात मागणी केली की ऋतुजा यांना बिनविरोध निवडून द्यावे आणि आपला उमेदवार मागे घ्यावा. त्याची दखल घेत भाजपने मुरजी पटेल यांची उमेदवारी मागे घेतली. मात्र, ठाकरे गटाला सहानुभूती मिळू नये तसेच पहिलाच मोठा विजय प्राप्त झाल्यास त्या गटाचे मनोबल वाढेल ही बाब लक्षात घेऊन राजकीयदृष्ट्या भाजपने उमेदवार मागे घेतला.
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर; ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके विजयी https://t.co/9uarAEAhu5
— India Darpan Live (@IndiaDarpanLive) November 6, 2022
तत्पूर्वी शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण हे दोन्ही गटांच्या वादामुळे गोठविण्यात आले. ठाकरे गटाला पेटती मशाल तर शिंदे गटाला ढाल तलवार ही निशाणी निवडणूक आयोगाकडून देण्यात आली. त्यामुळे ऋतुजा लटके या पेटत्या मशालीच्या निशाणीवर ही निवडणूक लढत आहेत. शिवसेना फुटीनंतरची ही पहिलीच निवडणूक असल्याने त्याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.
भाजपने उमेदवारी मागे घेतली पण अन्य अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या उमेदवारांनी माघार न घेतल्याने ऋतुजा यांच्यासह रिंगणात एकूण ९ उमेदवार राहिले. परिणामी, या निवडणुकीत मतदान झाले. मतदारांच्या निरुत्साहामुळे केवळ ३१ टक्केच मतदान झाले. दरम्यान, भाजपने उमेदवारी माघार घेतल्यानंतर प्रचार मात्र नोटाचा केल्याचे बोलले जात आहे. नोटाला सर्वाधिक मते मिळाली तर लटके यांच्या विजयाचा मार्गही अडचणीचा ठरु शकतो. त्यामुळे उघडपणे उमेदवार मागे घ्यायचा मात्र पडद्यामागे नोटाचा प्रचार करुन ठाकरे गटाच्या अडचणी वाढवायचा अशी रणनिती भाजपची असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून केला जात आहे. आता मतमोजणी सुरु झाली असून ताज्या निकालात आठव्या फेरीअखेर ठाकरे गटाच्या लटके यांना २९ हजार ३३ तर नोटाला ५ हजार ६५५ मते मिळाली आहेत.
अंधेरी पोटनिवडणुकीमुळे आज NOTA ची खूप चर्चा सुरू आहे
नियम असा आहे NOTA मतं पहिल्या क्रमांकावर राहिली तरी दुसऱ्या क्रमांकावरचा मतदार विजयी घोषित होतो
NOTA मतं सर्वाधिक असतील तर निवडणूक रद्द करण्याची याचिका सुप्रीम कोर्टाने मागे फेटाळली होती
— Prashant Kadam (@_prashantkadam) November 6, 2022
Andheri By Poll Election NOTA Discussion Why