येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शेतकऱ्यांना आपला पिकवलेला शेतमाल विक्री करण्यासाठी बाजारपेठांचे जास्तीत जास्त विकेंद्रीकरण करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले. छगन भुजबळ यांच्या हस्ते आज कृषी उत्पन्न बाजार समिती अंदरसुल उपबाजार येथे मका व भुसार मालाच्या लिलावास शुभारंभ करण्यात आला यावेळी आयोजित कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी छगन भुजबळ यांनी स्वतः शेतमालाच्या लिलाव प्रक्रियेत सहभाग घेतला.
यावेळी तहसिलदार प्रमोद हिले,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, माजी सभापती संजय बनकर, विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, ॲड.बाबासाहेब देशमुख, किसनराव धनगे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य महेंद्र काले, योगेश जहागीरदार, मकरंद सोनवणे, बाजार समितीचे प्रशासक प्रताप पाडवी, सचिन कळमकर, झुंजारराव देशमुख, हरिभाऊ जगताप, सरपंच सविता जगताप, संजय ढोले, अमोल सोनवणे, संतोष खैरनार यांच्यासह पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, देशात ६० टक्क्यांहून अधिक लोक शेती करत आहे. देशात कृषी क्षेत्रात शरदचंद्र पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली मोठी क्रांती झाली. त्यातून देश मोठ्या प्रमाणात शेतमाल निर्यात करत आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालाला मार्केट उपलब्ध होण्यासाठी मार्केटच विकेंद्रीकरण करणे अतिशय महत्वाचे असून तालुक्यात उपबाजार सुरू करण्यात आले आहे. त्यातून शेतकऱ्यांना अधिक फायदा होत असल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, अतिवृष्टीमुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत आहे. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत उपलब्ध करून देण्यासाठी आपले प्रयत्न सुरू आहे. अद्याप मात्र शेतकऱ्यांना शासनाकडून पाहिजे त्या प्रमाणात मदत उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी अभ्यास करूनच भविष्यात आपल्या हिताची जोपासना करणारे कोण आहे याबाबत आपला निर्णय घेण्याची वेळ आली आहे असे ते म्हणाले.
ते म्हणाले की, राज्यात अनेक कामांना स्थगिती देण्यात आलेली होती. त्यापैकी अद्यापही अनेक कामांची स्थगिती कायम आहे. त्यामुळे विकासाची कामे रखडली आहे. त्यामुळे काम करण्यास अडथळा निर्माण होत आहे. मात्र सर्व कामे आपण पूर्ण करू असे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी सर्व उपस्थित शेतकरी बांधवांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या.
Andarsul Chhagan Bhujbal Crop Auction