रायगड : रायगड जिल्ह्यात श्रीवर्धनमध्ये सोमवारी शिवसेनेच्या एका कार्यक्रमात माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी केलेल्या एका विधानामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. गीते यांनी महाविकास आघाडीत केवळ तडजोड आहे, जोपर्यंत आहे, तोपर्यंत आहे. ज्यादिवशी तुटेल त्यादिवशी काय ? असा प्रश्न उपस्थितीत करुन शरद पवार आमचे नेते होऊ शकत नाहीत असे सांगितले. त्याचबरोबर त्यांनी काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून राष्ट्रवादीचा जन्म झाला असा घाणाघातही केला. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये असलेले मतभेदही समोर आले आहे.
अनंत गीते यांनी बोलतांना सांगितले की पवार यांना जगाने कितीही उपाध्या देवोत, त्याला कोणी जाणता राजा म्हणो, पण आमचा गुरु ते होऊ शकत नाही, आमचे गुरु फक्त बाळासाहेर ठाकरेच आहे. यावेळी त्यांनी दोन काँग्रेस एक विचारांची होऊ शकत नाही तर शिवसेना ही काँग्रेस विचारांची कदापी होऊ शकणार नसल्याचेही सांगितले. या विधानामुळे महाविकास आघाडीतील मतभेद समोर आले असून त्यामुळे राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे.