किरण घायदार, नाशिक
नाशिक – यंदाच्या ज्येष्ठ नागरिक दिनाचे घोषवाक्य ‘ वृध्दत्वाचा सन्मान ‘ हे आहे. विभक्त कुटुंब पद्धती, परदेशात मुले आणि बदलणारी परिस्थिती यामुळे वृद्धाश्रम ही काळाची गरज बनली आहे. ज्येष्ठांनीही ती स्वीकारली आहे. या पुढच्या काळात वृद्धाश्रमात राहणा-या ज्येष्ठांची संख्या वाढत जाणार असेल, तर त्यांना आनंद, समाधान मिळेल व सन्मानाने जगता येईल, अशी रचना असली पाहिजे. या संकल्पनेतून ‘ आनंदालय ‘ हा सुंदर, सुसज्ज प्रकल्प गंगापूर रोडवरील सोमेश्वर लॉन्सजवळ साकारण्यात आला आहे. १५ पासून त्याचा प्रारंभ होईल.
रविवारी झालेल्या पत्रकार परिषदेच्या प्रारंभी ॲड. विनीत महाजन यांनी स्वागत केले. अध्यक्ष राजेश रत्नपारखी यांनी माहिती दिली. वनवासी व दुर्बल घटक विविध सेवा प्रकल्प न्यास आणि विश्व हिंदू परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने हे ‘आनंदालय ‘ उभे राहिले आहे. एक एकर जागेत २० हजार चौ.फूटांवर दोन मजली इमारत बांधण्यात आली असून वृध्दांना सोयिस्कर ठरतील अशा सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. दरमहा १५ हजार ते २० हजार रुपये देऊन सुखा – समाधानाने रहाता येईल. दोन, तीन व चार जणांची रहाण्याची सोय असणाऱ्या २४ खोल्या बांधण्यात आल्या आहेत. त्याशिवाय महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र निवास व्यवस्था देखील करण्यात आली आहे. सुसज्ज स्वयंपाकघर, भोजनकक्ष, वाचनालय, बैठे खेळघर बांधण्यात आले आहे. सौर उर्जेवर वीजेची गरज भागवली जाईल. आवश्यकतेनुसार वैद्यकीय सुविधा देण्यात येईल. एकूण ८५ वृध्द स्त्री, पुरुष येथे आयुष्याची संध्याकाळ आनंदाने सकारात्मक समाधानात घालवू शकतील. सहजीवन अनुभवू शकतील.
वृद्धाश्रम ही खरे तर पाश्चिमात्य संकल्पना. भारतीय संकल्पना वानप्रस्थाश्रमाची ! पण वानप्रस्थाश्रम हा स्वखुशीचा मामला होता. नंतर काळ बदलला तशी समजूत, रीत देखील बदलली. वाढत्या शहरीकरणात वृध्दाश्रम ही गरज बनली आहे. अनेक ज्येष्ठ आता स्वखुशीने वृद्धाश्रमात जाण्यास तयार असतात. वृद्धाश्रमांतही अनेक सुधारणा होत आहेत. या आनंदालयात घरपण, मायेचा ओलावा, आपलेपणा, जिव्हाळा आणि स्वातंत्र्य अनुभवता येईल. येथे गरजेनुसार परवडणाऱ्या शुल्कात कमीतकमी दहा दिवसांपासून पुढे अधिक काळापर्यंत सुखासमाधानाने राहता येईल. असे विविध पर्याय उपलब्ध आहेत.
वाडा, चौक अशी सुंदर रचना केलेली दिसते. आल्हाददायक वातावरण, उत्तम सेवा व सर्वांना परवडणारे दर ही आनंदालयाची त्रिसूत्री आहे. अनेक संस्था, आस्थापना यांनी देणग्या देऊन आनंदालय वास्तू उभारणीत मोलाचे योगदान दिले आहे. अनेक कंपन्या यांनी सी.एस.आर फंडाच्या माध्यमातून सहकार्य केले आहे. तसेच दानशूर दात्यांनी भरघोस मदत केली आहे. संपतराव पाटील, सतीश चितळे, श्रीराम महाजन, महेंद्र वारे, चंदूभाई पटेल, ॲड. श्याम घरोटे, किर्तिश जोशी यांनी अखंड परिश्रम करून हा प्रकल्प आकाराला आणला आहे. अधिक माहितीसाठी संस्थेचे खजिनदार हेरंब गोविलकर ९८९०३६८६८९ व प्रकल्प प्रमुख अपर्णा रत्नपारखी ९८८११५५१८० यांच्याशी संपर्क साधता येईल. सतीश पाटील यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.