प्रयागराज (उत्तर प्रदेश) – आखाडा परिषदेचे अध्यक्ष नरेंद्र गिरी यांच्या संशयास्पद मृत्यूची चौकशी करणारी सीबीआयची टीम छापे टाकण्यासाठी प्रयागराजमधून थेट आनंद गिरी यांच्या हरिद्वार येथील आश्रमात पोहोचली. येथे झाडाझडती केली असताना आनंद गिरी यांचा लॅपटॉप, आयफोन इत्यादी साहित्य जप्त करण्यात आले. या साहित्यामध्ये महत्त्वाचे पुरावे असल्याचे समजते.
सीबीआयच्या आगमनापूर्वीच आनंद गिरी यांच्या आश्रमातून DVR (डिजीटल व्हिडिओ रेकॉर्डर्स म्हणजेच सीसीटीव्हीचे फुटेज) गायब केल्याची बाब समोर आली आहे,. हे ऐकल्यावर सीबीआय अधिकारी संतापले. त्यामुळे सीबीआयकडून आश्रमात चोरीच्या आरोपाखाली पकडलेल्या संशयितांची चौकशी रात्री उशिरापर्यंत सुरु होती. विशेष म्हणजे नरेंद्र गिरी यांच्या मृत्यूनंतर, पोलिसांनी आनंद गिरी यांना हरिद्वारमधील गजीवाला आश्रमातून पकडले व प्रयागराजमध्ये आणले होते. त्यानंतर एसआयटीने आनंद गिरीला तुरुंगात पाठवले, परंतु सीबीआयने तपास सुरू केला तेव्हा आनंद गिरीसह तीन आरोपींना कोठडी रिमांड देण्यात आले.
सीबीआयचे एक पथक चौकशीसाठी आनंद गिरी यांना विमानाने डेहराडूनला घेऊन गेले. तेथून सीबीआयचे पथक आनंद गिरी यांना वाहनांमध्ये डांबून हरिद्वार येथील त्यांच्या आश्रमात घेऊन गेले. या टीमने आश्रमात शोध मोहिमेदरम्यान, आनंद गिरीचा आयफोन आणि लॅपटॉप त्याबरोबर चार सैनिकांचे मोबाईलही जप्त केले. या आयफोनचा जुना डेटा मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
सीबीआयला सांगण्यात आले की, चार दिवसांपूर्वी एक तरुण आनंद गिरीच्या आश्रमात घुसला होता, त्याला आजूबाजूच्या लोकांनी चोरी करताना पकडले होते.त्यानंतर श्यामपूर पोलिसांनी आरोपीला अटक करून तुरुंगात पाठवले, परंतु आरोपीकडून अद्याप डीव्हीआर जप्त करण्यात आले नाही. तसेच सीबीआयने आश्रमाशी संबंधित दोघांची चौकशी केली.
हरिद्वार येथील आनंद गिरी यांच्या आश्रमातून डीव्हीआर गायब झाल्यानंतर सीबीआयचा संशय बळावला आहे. कारण सर्वप्रथम, आनंद गिरीच्या अटकेनंतर, जेव्हा पोलिसांनी त्याचा आश्रम सील केला होता, तेव्हा चोर तिथे कसा घुसला ? असा प्रश्न निर्माण होत असून या संपूर्ण प्रकरणात DVR हा एक महत्त्वाचा पुरावा असू शकतो. तसेच सीबीआयला काही महत्त्वाची माहिती मिळू शकली असती. डीव्हीआर गायब झाल्यावर, ही एक सामान्य चोरीची घटना आहे की त्यामागे काही मोठे षडयंत्र लपलेले आहे, असा प्रश्न पोलीसांना पडला आहे.