त्र्यंबकेश्वर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सुप्रसिध्द पर्यटनस्थळ पहिने परिसरात सापडलेल्या आठ ते नऊ फुट अजगराला येथील सुप्रसिध्द सर्पमित्र ज्ञानेश्वर सोनार यांनी सुरक्षित पकडून नैसर्गिक अधिवासात सोडल्याने परिसरातून त्याचे कौतुक होत आहे.
पर्यटकांचे आवडते पर्यटन स्थळ असलेल्या पहिने परिसरातील भाऊराव डगळे यांचे ढाब्याजवळ रात्री दहाचे सुमारास त्यांना एक मोठा अजगर आढळून आला. त्यांनी त्वरीत त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त डॅा. सत्यप्रिय शुक्ल यांना फोनवरुन कळवले. शुक्ल यांनी त्वरीत सर्पमित्र ज्ञानेश्वर सोनार यांना कळवले. सोनार आपले सहकारी राजू माहुलकर, सागर कडलग यांच्यासह तेथे पोहोचुन मित्रांच्या मदतीने अजगर पकडला. यावेळी डॅा. सत्यप्रिय शुक्ल, भाऊराव डगळे, रामदास डगळे, सुनिल डागळे आदी उपस्थित होते. अजगराचे वजन जवळपास १५ किलो पेक्षा जास्त होते.
अजगर पकडल्याची माहिती त्यांनी त्यांचे मार्गदर्शक नाशिकचे सर्पतज्ञ मनिष गोडबोले यांना कळवली. त्यानंतर त्र्यंबकेश्वर वनविभागात इंडियन रॉक पायथन अजगराची नोंद करून मनिष गोडबोले यांच्या मार्गदर्शनाखाली या अजगराला नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले. या वेळी नाशिकचे सर्परक्षक राकेश मराठे, राजू पठाण, छायाचित्रकार विनोद गवई, वन्यजीव प्रेमी अनघा निमकर आदी उपस्थित होते. सर्पमित्र ज्ञानेश्वर सोनार यांनी आजपर्यंत शेकडो विविध जातींचे साप, नाग, तिन अजगर, विविध जखमी पक्षी पकडून वन विभागाकडे त्यांची नोंद करून सुरक्षित पणे जंगलात सोडून त्यांना जिवदान दिले आहे.
तस्कराच्या पिल्लांना जिवदान
सोनार यांनी येथील पाचआळी परिसरात एक तस्कर मादी जातीचा साप धरला होता. त्या तस्कराने १२ अंडी दिली होती. या सापाला सोडून देण्यात आले. त्यानंतर मनीष गोडबोले यांच्या मार्गदर्शनाखाली सोनार यांनी दोन महिने अंडी सांभाळली. दोन महिन्यानंतर दहा पिल्ले त्या अंड्यामधून निघाली त्या पिल्लांना वनविभागाच्या जंगलामध्ये सोडून देण्यात आले.