इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – आपल्याकडे साधारणतः उन्हाळा सुरू झाला की बहुतांश छोट्या -मोठ्या शहरांमध्ये घरोघरी वर्षभरासाठी गहू, तांदूळ, डाळींसह अन्य अन्नधान्य आणि कडधान्य बाजारातून विकत आणून (भरून ), वाळवून आणि साठवून ठेवण्याची लगबग सुरू होते. विशेषतः मे महिन्यात अनेक कुटुंबांमध्ये हा उपक्रम दिसून येतो, परंतु पावसाळ्यात ओलावा आल्याने किंवा अन्य कारणाने धान्याला कीड लागते, त्यामुळे सदर अन्नधान्य पुन्हा एकदा ऑक्टोबर हीट मध्ये वाळून ठेवावे लागते.
या त्रासदायक आणि कटकटीच्या गोष्टींमुळे अलीकडच्या काळात अनेक जण गहू विकत घेण्याऐवजी थेट गव्हाचे पीठ किराणा दुकानातून किंवा मॉल मधून खरेदी करताना दिसतात. सहाजिकच सम्राट व आशीर्वाद यासारख्या कंपन्यांच्या गव्हाच्या पिठाचा मागणी वाढलेली दिसते. परंतु आता या अमूल ही दूध आणि दुग्धजन्य पदार्थ बनविणारी कंपनी या व्यवसायात आणि स्पर्धेत उतरणार आहे. विशेष म्हणजे अमूल कंपनीच्या गव्हाचे पीठ हे सेंद्रिय पद्धतीने तयार झालेल्या गव्हापासून तयार करण्यात आल्याचे सांगण्यात येते.
गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड (GCMMF), अमूल ब्रँड अंतर्गत उत्पादने देणारी डेअरी कंपनी, सेंद्रिय गव्हाचे पीठ लाँच केले आहे. GCMMF कंपनीने सांगितले की, या व्यवसायांतर्गत लाँच केलेले पहिले उत्पादन ‘अमूल ऑरगॅनिक होल व्हीट आटा’ आहे. कंपनी भविष्यात मूग डाळ, तूर डाळ, चना डाळ आणि बासमती तांदूळ यांसारखी उत्पादनेही बाजारात आणणार आहे.
विशेष म्हणजे जूनच्या पहिल्या आठवड्यापासून, गुजरातमधील सर्व अमूल पार्लर आणि रिटेल आउटलेटवर सेंद्रिय पीठ उपलब्ध होईल. जूनपासून गुजरात, दिल्ली, मुंबई आणि पुणे येथेही ऑनलाइन ऑर्डर करता येणार आहे. एक किलो पिठाची किंमत 60 रुपये आणि पाच किलो पिठाची किंमत 290 रुपये आहे.
याबाबत कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आर.एस.सोढी म्हणाले की, याकरिता सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना एकत्र आणले जाईल आणि दूध संकलनाचे जे मॉडेल आहे, तेच मॉडेल या व्यवसायातही स्वीकारले जाईल. यामुळे सेंद्रिय शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल आणि सेंद्रिय अन्न उद्योग अधिक प्रगत होईल. तसेच सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना बाजारपेठेशी जोडण्यासोबतच अमूल देशभरात पाच ठिकाणी सेंद्रिय चाचणी प्रयोगशाळा उभारणार आहे. तसेच अहमदाबाद येथील अमूल फेड डेअरीमध्ये अशा प्रकारची पहिली प्रयोगशाळा उभारली जात आहे.