नाशिक – अध्यात्म, योग, मेडिटेशन हे आपल्या देशाची ताकद आहे. आज आपल्या देशांवर इतकी आक्रमणं झाली पण अध्यात्माला कोणीही धक्का लावू शकले नाही. आपल्या देशाच्या संस्कृतीचे हे एक महत्त्वाचे अंग आहे. ही संस्कृती आपल्याच देशाकडे आहे. त्यामुळे आपण या गोष्टीच ज्ञान घेणं आवश्यक आहे. आयुष्यात अनेक अडचणी येतात पण त्यावर मात करून यशस्वी होण्यासाठी अध्यात्माची कास धरली पाहिजे, असे मत जिल्हा परिषद सदस्या व आर्किटेक्ट अमृता पवार यांनी व्यक्त केले.
इंडिया दर्पण फेसबुक लाईव्हमध्ये त्या बोलत होत्या. बागेश्री पारनेरकर हिने मुलाखत घेतली. अमृता पवार या स्व. माजी खासदार डॉ. वसंतराव पवार यांच्या कन्या असून आर्किटेक्ट आहे. वडिलांचा समाजकारण व राजकारणचा वारसा त्या सक्षमपणे पुढे चालवत आहेत. राजकीय प्रवासविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, बाबा गेल्यानंतर कोणीही राजकारणात जायचं नाही असं आम्ही ठरवलं होतं. मी ऑस्ट्रेलियात शिक्षण घेऊन तिथे प्रॅक्टिस करत होते. सकाळी सहा पासून मी तिकडे कामाला सुरुवात करायचे. तेव्हा बाबा मला कायम म्हणायचे की हेच काम तू आपल्या देशासाठी, शहरासाठी कर. आणि बाबा गेल्यानंतर मला जाणवलं की आपण आपल्या लोकांसाठी काहीतरी काम करायला हवं आणि मी भारतात आले, आणि सुप्रियाताई सुळे भेटल्या आणि मग समाजकारण आणि राजकारणातला प्रवास सुरु झाला. काम करत असताना एक तत्व मी कायम पाळते, समाजकारण महत्वाचे आणि ओघाने राजकारण येतेच, असे त्या म्हणाल्या.
स्वतःचा व्यवसाय सांभाळून त्या राजकारणात कशा सक्रिय आहेत याविषयी त्या बोलल्या की, राजकारण हा हा माझा व्यवसाय नाही. आणि व्यवसाय म्हणून करायचं पण नाही.आज पुढची पिढी माझ्याकडे बघणार आहे तेव्हा मी त्यांच्यासमोर काय आदर्श ठेवते हे महत्त्वाचे आहे. गोदावरी अर्बन को ऑप बँकेच्या चेअरमन म्हणूनही त्या कार्यरत आहेत त्याविषयी त्यांनी सांगितले की, को ऑप बँक ही सहकार तत्वावर चालते. आरबीआय आणि सहकार खातं यांच्या अंतर्गत काम करावे लागते. बऱ्याचदा आरबीआय एक सांगते तर सहकार खातं एक सांगते. आणि लोकांचा आपल्यावर विश्वास असतो. अशावेळी दोघांचा मेळ घालून काम करावे लागते, आणि हे जास्त आव्हानात्मक आहे.
ताण तणावाच्या व्यवस्थापनाविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, आजच्या स्पर्धेच्या काळात ताण येतोच पण मुळातच आध्यत्मिक आवड असल्याने सातत्याने जप, मेडिटेशन करते आणि त्याचा नक्कीच फायदा होतो. अनेकदा रडत बसण्यापेक्षा गोष्टी सोडून द्यावे लागतात, शांत राहून काम करावं लागतं हे मी शिकले. निवृत्तीनाथ मंदिराच्या आर्किटेक्चरच्या अनुभवाविषयी त्यांनी सांगितले की, कुंभमेळ्याच साधुग्राम गेट मी तयार केले होते. आणि ते वारकऱ्यांनी पाहिलं आणि त्यांना ते आवडले. निवृत्तीनाथ मंदिराचा प्रस्ताव माझ्याकडे आल्यावर मी अभ्यासासाठी वेळ मागितला. मंदिराचं एक शास्त्र असतं, मी आणि माझ्या टीमने पुस्तक वाचून पाच ते सहा महिन्यानंतर मी प्लॅन सादर केला. तो त्यांना आवडला आणि ते काम पूर्ण झालं.
महिला सक्षमीकरणाविषयी मत मांडताना त्या म्हणाल्या की, आज राजकारणात ५० टक्के महिला आहेत. महिलांनी न्यूनगंड बाजूला ठेवून आपल्या समस्या पुढे येऊन मांडल्या पाहिजेत. स्वतःसाठी बोललं पाहिजे. भारतीय महिलांमध्ये एकाचवेळी अनेक कामं करण्याची क्षमता असते. तो गुण ओळखून आपल्या गुणांना वाव दिला पाहिजे. प्रत्येक महिलेने आर्थिकरित्या सक्षम होणं गरजेचं आहे. स्त्री पुरुष समानतेच्या जगात वावरताना कोणाच्या पुढेही जायचं नाही आणि मागेही राहायचं नाही हे लक्षात घेणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.