छत्रपती संभाजीनगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात, तसेच त्या आपले फोटो आणि मजकूर पाठवतात. त्यांच्या फोटो आणि मजकुराला अनेक जण प्रतिक्रिया देतात, परंतु अशी प्रतिक्रिया देणे एका उच्चशिक्षित तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. या बाबतचा गैरप्रकार निदर्शनास येताच भाजप पदाधिकाऱ्यांच्या माहितीवरून पोलिसांनी काही तासांत त्याला ताब्यात घेतले. अतिष काबरा (३५, रा. ज्योतीनगर) असे आरोपीचे नाव असून तो व्यवसायाने सीए आहे.
ट्विटर पोस्टवर आक्षेपार्ह कमेंट
बँकेत नोकरी करत असतानाच गायन आणि अन्य कला जोपासणाऱ्या अमृता फडणवीस सोशल मिडियाच्या प्रत्येक प्लॅटफार्मवर सक्रिय असतात. त्यांना फॉलो करणाऱ्यांची संख्या देखील लाखांमध्ये आहे. अनेक घटना, घडामोडी, सण आदींवर तो त्या व्यक्त होत असतात. माध्यमांमध्ये त्यांच्या अनेक पोस्टची दखल घेतली जाते. परंतू त्यांच्या एका ट्विटवर आक्षेपार्ह कमेंट करणे ‘सीए’ ला थेट पोलिस ठाण्यात घेऊन गेल्याचा प्रकार शहरात समोर आला. काल ३० जून रोजी अमृता फडणवीस यांच्या ट्विटर पोस्टवर अतिषने आक्षेपार्ह कमेंट केली. त्यामुळे ही कमेंट पाहून अनेकांना धक्का बसला. याबाबत भाजप पदाधिकाऱ्यांनी तात्काळ याची दखल घेत सदर तरुणाला जाब विचारला, तसेच त्याची पोलिसांकडे देखील तक्रार केल
सोशल मीडियाचा गैरवापर
भाजप पदाधिकाऱ्यांच्या हा प्रकार निदर्शनास येताच त्यांनी भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र साबळे, भाजप महिला मोर्चाच्या शहराध्यक्ष अमृता पालोदकर यांना प्रकार कळवला. सायबर पोलिस ठाण्याच्या निरीक्षक प्रविणा यादव यांना त्यांच्याकडून हा प्रकार कळताच त्यांनी अतिषच्या प्रोफाईलवरुन त्याचा शोध सुरू करत लागलीच ताब्यात घेतले. पालोदकर यांच्या फिर्यादीवरुन अतिषवर गुन्हा दाखल करण्यात आला. वास्तविक अतिष हा सीए असून उच्चशिक्षित आहेत. त्याला पोलीसांनी ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पुढील कारवाई सुरू आहे. शिवाय, ट्विटवरील आक्षेपार्ह कमेंट देखील हटवण्यात आली आहे. सोशल मिडियाचा वापर करताना नागरिकांनी काळजी घ्यायला हवी. पोलिसांचे तेथील प्रत्येक हालचालीवर बारकाईने लक्ष आहे, असे या संदर्भात तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र गेल्या काही दिवसांपासून असे प्रकार वारंवार घडविण्यात असल्याने सोशल मीडियाचा गैरवापर वाढल्याचे दिसून येते.