इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – भारतात महिलांप्रती आदर व्यक्त केला जातो. हीच भारताची संस्कृती आहे. असे असले तरी अलीकडे या संस्कृतीला गालबोट लागत असल्याचे चित्र आहे. राज्य सरकारमधील एका मंत्र्याने महिला खासदारांसाठी शिवराळ भाषा वापरल्यानंतर योगगुरू रामदेव बाबा यांचेही तोंड नुकतेच सुटल्याचे साऱ्यांनी पाहिले. रामदेव बाबा यांनी महिलांबाबत केलेल्या विधानावरून आता देशभरात गदारोळ सुरू झाला आहे. या घटनेचा देशभरातून निषेध व्यक्त होत असताना सामाजिक कार्यकर्त्या, गायिका अमृता फडणवीस यांनी त्याची पाठराखण केली आहे. महिलांच्या स्वातंत्र्यावर बोलण्याचा त्यांचा हेतू होता. परंतु, त्यांना हे विधान योग्यरित्या मांडता आले नाही असे सांगत वेगळ्या पद्धतीने तसेच अधिक सभ्यपणे त्यांना आपली भूमिका मांडता आली असती असेही अमृता फडणवीस म्हणाल्या.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी असण्यासोबतच समाजसेविका, गायिका अशी स्वतंत्र ओळख असलेल्या अमृता फडणवीस या त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे देखील प्रसिद्ध आहेत. एका वृत्तपत्राच्या कार्यालय भेटीदरम्यान त्यांनी हा संवाद साधला. यावेळी त्यांना रामदेव बाबा यांनी महिलांबाबत केलेल्या वक्तव्याबाबत विचारणा करण्यात आली यावर त्यांनी आपले मत मांडले. रामदेव बाबा यांना केवळ एक वाक्य व्यवस्थितरित्या मांडता आले नाही. आणि नेमक्या याच वाक्यावरून गोंधळ निर्माण झाला. त्यांना वेगळ्या शब्दात आणि अधिक सभ्यपणे आपली भूमिका मांडता आली असती, असंही त्या म्हणाल्या.
या भेटीत महाराष्ट्राच्या राजकारणावर देखील त्यांनी भाष्य केलं. देवेंद्र फडणवीस हे प्रतिभावान नेते आहेत. त्यांना केंद्रात स्थान मिळू शकते, असे म्हटले जाते. मात्र, महाराष्ट्राला त्यांच्यासारख्या प्रतिभावान नेत्याची गरज असल्याचे त्या म्हणाल्या. त्यांच्या राजकीय प्रवेशाबाबत त्या म्हणाल्या की, राजकीय नेत्याची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. सक्रिय राजकारणात येण्यासाठी पूर्ण वेळ देणे आवश्यक आहे. मात्र, सध्या काम, समाजसेवा, मुलीला वेळ देणे, गायन यामुळे बरेच व्यग्र राहावे लागते. त्यामुळे जेव्हा आपण राजकारणासाठी पूर्ण वेळ देऊ, असे वाटेल तेव्हाच सक्रिय राजकारणात येण्याचा विचार करू, असे त्यांनी स्पष्ट केले.
Singer Amruta Fadanvis on Politics Entry