ठाणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विषयी सध्या महाराष्ट्रात प्रचंड रोष दिसून येत आहे. कारण राज्यपाल हे वारंवार काहीतरी वादग्रस्त विधान करतात आणि त्यातून वादंग घडते. काही दिवसांपूर्वी त्यांनी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या बद्दल वादग्रस्त विधान केले होते. त्यानंतर पुन्हा त्यांनी गुजराती आणि राजस्थानी व्यापाऱ्यांबद्दल असेच वेगळे उद्गार काढून महाराष्ट्रातील जनतेचा रोष उडवून घेतला होता.
आता पुन्हा एकदा ते वादाच्या भवऱ्यात सापडले आहेत. कोश्यारी यांनी काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजां विषयी वादग्रस्त विधान केले होते. त्या विधानानंतर राज्यातील राजकारण पुन्हा तापलेले दिसून आले. मात्र, या विधानाचे पडसाद आजही कायम आहे. शरद पवार, उध्दव ठाकरे या प्रमुख नेत्यांसह विरोधकांनी राज्यापालांवर टीकेची झोड उठवली आहे. तसेच त्यांना राज्यपाल पदावरुन हटवण्याची मागणी देखील जोर धरु लागली असतानाच आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी राज्यपाल कोश्यारींची पाठराखण केली आहे.
याबाबत अमृता फडणवीस म्हणाल्या की, महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे मराठी माणसांवर, मराठी भाषेवर खूप प्रेम आहे. अनेकदा बोलताना ते वेगळे बोलत असतात, परंतु लोक वेगळे समजतात, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी कोश्यारी यांच्या विधानाचे समर्थन केले छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे कोश्यारी अडचणीत आले आहेत.
पतंजली योगपीठ आणि मुंबई महिला पतंजली योग समितीच्या वतीने शुक्रवारी योग विज्ञान शिबिर व महिला संमेलनाचे आयोजन ठाण्यात करण्यात आले होते. या संमेलनास अमृता फडणवीस उपस्थित होत्या. त्यावेळी पत्रकारांनी त्यांना कोश्यारी यांच्या वक्तव्याबद्दल प्रश्न विचारला.
त्यावेळी अमृता म्हणाल्या की, महाराष्ट्रात आल्यावर मराठी शिकलेले ते एकमेव राज्यपाल आहेत. अनेकदा बोलताना ते वेगळे बोलतात, परंतु लोक ते वेगळेच समजतात. मराठी बोलण्याच्या वेगात ते काही बोलून जातात. त्याचा वेगळा अर्थ काढला जातो. ते मनापासून महाराष्ट्र आणि मराठी माणसावर प्रेम करणारे आहेत. मराठी माणसांवर त्यांचे खूप प्रेम आहे. हे मी स्वत: देखील अनुभवले आहे. मात्र, अनेक वेळा त्यांच्या भाषणाचा चुकीचा अर्थ काढला जातो, असेही त्या म्हणाल्या.
Amruta Fadanvis on Governor Bhagat Singh Koshyari