पुणे (इंडिया दर्पण वृतसेवा) –: माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या नेहमीच अनेक विषयांवर आपले सडेतोड आणि रोखठोक मत व्यक्त करत असतात. सहाजिकच राजकीय व सामाजिक विषयांवर त्यांच्या मतांवर उलट सुलट चर्चा सुरू होऊन वाद निर्माण होतो. सध्या देखील अशाच एका त्यांच्या वक्तव्यावर वादंग सुरू आहे. परंतु खेदाची गोष्ट म्हणजे काही ट्रोलकरणाऱ्यांनी सोशल मीडियावर त्यांच्याविषयी अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. तर काही जणांनी त्यांच्या मताला पाठिंबा दिला आहे.
अमृता यांनी भारतात देखील देहविक्री व्यवसायाला ‘प्रोफेशन’ म्हणून मान्यता देण्याची सरकारकडे मागणी केली. तसेच इतर व्यवसायांप्रमाणे देहविक्री व्यवसायाला सन्मान मिळाला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. बुधवार पेठेतील देहविक्रय करणाऱ्या महिलांसाठी मोफत आरोग्य शिबीर व मुलींसाठी सुकन्या कार्डचे वाटप कार्यक्रमात आल्या होत्या. यावेळी देहविक्री व्यवसायातील महिलांसमोर त्या बोलत होत्या.
यावेळी अमृता फडणवीस म्हणाल्या की, आम्ही सरकारला असे सांगतो की, जसा इतर व्यवसायांना सन्मान असतो, त्याप्रमाणे देहविक्री व्यवसायाला देखील आदर मिळाला पाहिजे. त्याला एक व्यवसाय म्हणून स्विकारले पाहिजे. जर्मनीसारख्या देशांमध्ये देहविक्री व्यवसाय करणाऱ्यांचं आदरणीय स्थान आहे. देहविक्री व्यवसाय करणारे या देशांमध्ये कर देखील भरतात. तेच स्थान आपण सर्वजण एकत्र आलो तर भारतात देखील मिळू शकते, मी या निर्णयाच्या पाठीशी आहे.
तसेच त्या म्हणाल्या की, तुम्ही तुमच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचे आहे. त्यामुळे कितीही घाई असेल तर देहविक्री व्यवसायातील महिलांनी आपली वैद्यकीय तपासणी करावी. ज्या व्यवसायात आहात त्यात काही आजार होण्याचा धोका असतो, तो धोका ओळखा. तसेच नियमितपणे आपली तपासणी करून घ्या. त्यासाठी तुमच्यामागे भारतीय जनता पक्ष उभा आहे,” असेही अमृता यांनी सांगितले त्या पुढे म्हणाल्या, आपल्या मुलींना शिकवा. आपल्या मुलांसाठी बचत करा. त्याचा नक्की उपयोग होईल. वृद्धापकाळात वृद्धाश्रमाची गरज असते. त्यासाठी आपण पूर्णपणे प्रयत्न करू. मात्र, तुम्ही देखील आपल्या मुलांसाठी बचत करायला विसरू नका.