अमरावती (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ठाकरे गटाने सरकारचा निषेध करत खराब रस्त्याला फडतूस मार्ग असे नाव देऊन अमरावतीमध्ये पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात आंदोलन केले. शहरातील रस्त्यांची दुरावस्था झाल्यामुळे नागरिकांमध्ये संताप असतांना हा प्रश्न घेऊन ठाकरे गटाचे शिवसैनिक आज रस्त्यावर उतरले.
शिवसेना ठाकरे गटाकडून विद्युत भवनासमोर हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात राज्य शासनाचा निषेध करुन राज्य शासनाचा फडतूस मार्ग असे खड्डेमय रस्त्याचे नामकरण केले. त्याचबरोबर रस्त्याच्या दोन्ही बाजूला फडतूस मार्ग नावाचे फलक लावले. यावेळी राज्य शासनाच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या.
राज्याचे उपमुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस हे अमरावतील जिल्ह्याचे पालकमंत्री आहे. तरी सुध्दा जिल्ह्यातील रस्त्यांची ही दुरावस्था झाली असल्याचा मुद्दा पकडून ठाकरे गटाने हे आंदोलन केले. रस्ते खड्डेमय असताना महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागानेही दखल न घेतल्याने ठाकरे गटाने संताप व्यक्त केला.