अमरावती (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – खताचे पोते शेतात घेऊन जाताना शहानुर नदीत ३५ वर्षीय तरुण शेतकरी मंगळवारी सकाळी वाहून गेल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील येवदा येथे घडली आहे. एनडीआरएफच्या बचाव पथकाकडून परिसरात रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
समीउल्लाह खान जहागीर खान (३५) असे वाहून गेलेल्या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. खान हा मंगळवारी सकाळी सात वाजता येवदा येथील शेतात खताचे पोते घेऊन गेला होता. त्याचवेळी शहानूर नदीतील पाण्याचा प्रवाह अचानक वाढला. कुठलीही सूचना न देता शहानुर धरणातून पाणी सोडण्यात आले. त्यामुळे शेतकरी प्रवाहात वाहून गेला. घटनेची माहिती मिळता तालुका प्रशासनासह बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. गावकऱ्यांच्या मदतीने शोध कार्य राबविले जात आहे.
ग्रामस्थ म्हणाले की, ते म्हणाले, शहानुर नदी गावाला वेढा देऊन जाते. या नदीवर पूल बांधावा यासाठी वारंवार मागणी करण्यात येते. तत्कालीन पालकमंत्री यशोमती ठाकूर, आमदार बळवंत वानखडे यांच्याकडून पुलाच्या कामाचे उद्घाटनही करण्यात आले. मात्र कामकाजाला सुरुवात झाली नाही. तर कुठलीही पूर्वसूचना न देता धरण प्रशासनाने पाणी सोडल्याने सदर शेतकरी वाहून गेला आहे. या प्रकरणी दोषींविरुद्ध कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे. शेतकऱ्याचा तत्काळ शोध घेऊन त्यांच्या कुटुंबियांना प्रशासनाने सर्वंकष मदत करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते नकुल सोनटक्के यांनी केली आहे. तसे पत्र त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.
Amravati Young Farmer Death River Water Discharge