अमरावती (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्ह्यातील मेळघाटातील धारणी उपजिल्हा रुग्णालयात एका गरोदर मातेने तब्बल चार मुलींना जन्म दिला आहे. हे चारही बाळं आणि माता सुखरुप असल्यामुळे या बाळंतपणाची मेळघाटात चर्चा आहे. या चारही बालकांचं वजन १ किलो ३०० पेक्षा कमी असल्याने त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे. दरम्यान, गर्भवती असताना या महिलेची सोनोग्राफी करण्यात आली. त्यात या महिलेला जुळी मुली असल्याचे निदर्शनास आले होते. प्रत्यक्षात प्रसुती वेळी या महिलेने ४ बाळांना जन्म दिला आहे.
धारणी तालुक्यातील दूनी गावातील पपीता बलवंत उईके या बुधवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास धारणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. यावेळी रुग्णालयातील स्त्रीरोग तज्ज्ञांनी पपीताची सामान्य प्रसृती यशस्वीरित्या पार पाडली. मात्र या प्रसुती दरम्यान गरोदर पपीताने एका नंतर एक अशा तब्बल चार मुलींना जन्म दिल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. उपजिल्हा रुग्णालयातील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. प्रीती शेंद्र, परिचारिका तेजस्वी गोरे, नंदा शिरसाट यांच्या टीमने ही प्रसुती केली.
हा आहे गिनिज बुक ऑफ वर्ल्डचा रेकॉर्ड
दोन महिन्यांपूर्वी झारखंडमधील एका महिलेने एकाच वेळी पाच बाळांना जन्म दिला होता. त्यानंतर अमरावतील जिल्हयातील महिलेने चार बाळांना जन्म दिला. खरं तर ९ बाळांना जन्म देण्याचा गिनिज बुक ऑफ वर्ल्डचा रेकॉर्ड मोरक्कोच्या हलीमा सिसे यांच्या नावावर आहे. या महिलेने २०२१ ला एकाच वेळी ९ मुलांना जन्म दिला. यात ५ मुली आणि ४ मुलं होती.