अमरावती (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक पाठोपाठ आता अमरावती मध्ये देखील हायटेक पद्धतीने एका परीक्षेमध्ये कॉपी करण्याचा प्रयत्न उघडकीस आला आहे. तलाठी भरती परीक्षेच्या तिसऱ्या सत्रामध्ये हायटेक कॉपी करणाऱ्याला एकाला पोलीसांनी ताब्यात घेतलं आहे. त्याच्याकडून मोबाईल, डिव्हाईस, ईअर फोन जप्त करण्यात आले असून उमेदवारांना परीक्षा केंद्रात आत सोडण्याआधी तपासणी केली जात असताना बीड जिल्ह्यातून येथे परिक्षा देण्यासाठी आलेल्या दीपक चवरे या उमेदवाराकडे हायटेक सामुग्री सापडल्याने खळबळ उडाली आहे.
रॅकेट असण्याची शक्यता
एमपीएससी मार्फत होणारे वरिष्ठ पदासाठीच्या परीक्षा असो की तलाठी पदासाठी होणाऱ्या अन्य परीक्षा असो यामध्ये आता गेल्या काही दिवसा त गैरप्रकार वाढलेली दिसून येतात. त्यातच गेल्या अनेक दिवसांपासून तलाठी परीक्षा चर्चेत आहे. अगदी परीक्षेची तारीख जाहीर झाल्यापासून या संपूर्ण प्रक्रियेत येणाऱ्या अडचणींची चर्चा जास्त झाली. कॉपी प्रकरण असो की, सर्व्हर डाऊनमुळे आतापर्यंत अनेक अडचणी आल्या. आता पुन्हा यामध्ये हायटेक कॉपीची सामुग्री सापडल्याने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. या पुर्वी देखील नाशिकमध्ये तलाठी भरतीच्या परीक्षेमध्ये पेपर फुटीची घटना घडली असून त्या प्रकरणी गणेश गुसिंगे या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. त्याने पिंपरी चिंचवड पोलिस भरती प्रक्रियेमध्ये आणि म्हाडाच्या परीक्षेचा पेपर फोडल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर दोन वर्षे तो फरार होता. यावर आणखी भयानक घटना म्हणजे वैद्यकीय भरती प्रक्रियेच्या एका परीक्षेच्या गुणवत्ता यादीतही आरोपीचे नाव आले आहे. त्यामुळे या आरोपीचा किती पेपर फुटींमध्ये समावेश आहे, यामागे नेमके कोणते रॅकेट कार्यरत आहे याची चौकशी केली जात आहे. आता अमरावतीच्या एका परीक्षा केंद्रात हा प्रकार घडला असून पोलीसांनी या प्रकरणी दिपक चावरे या तरुणाविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
समन्वय समिती आक्रमक
शासकीय परीक्षांमध्ये गेल्या दहा वर्षात प्रचंड अफरातफर आणि गैरप्रकार वाढले आहेत. राज्यातील तलाठी भरती परीक्षेत उघडकीस येत असलेला गैरप्रकार पाहता या सगळ्या संदर्भात तातडीने चौकशी समिती नेमावी, या मागणीसाठी स्पर्धा परीक्षा समन्वय समिती मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याच्या तयारीत आहे. राज्यभरात तलाठी भरती परीक्षा पार पडत असताना या परीक्षेत हायटेक कॉपी प्रकरण आणि आणखी काही गैरप्रकार समोर येत आहे. यामध्ये आरोपी गणेश गुसिंगेसह मोठी टोळी कार्यरत असल्याचा संशय आहे. या गैरप्रकारामुळे प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या उमेदवारांवर अन्याय होत असल्याने चौकशी करून स्पर्धा परीक्षा समन्वय समितीमधील परीक्षा देणारे उमेदवार मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याची माहिती आहे. मात्र या प्रकरणी विद्यार्थ्यांना खरच न्याय मिळेल का अशी शंका व्यक्त केली जात आहे कारण यापूर्वी असेच गैरप्रकार घडले असून केवळ चौकशी करून प्रकरण थांबले आहेत पुन्हा त्याच घटना वारंवार घडत आहेत.
Amravati Talathi Recruitment High Tech Copy Case Police Crime
Government Job Vacancy Exam