अमरावती (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथील केमिस्टच्या हत्येला १० दिवस उलटले आहेत. हत्या झालेल्या उमेश कोल्हे (वय ५४ वर्षे) यांनी भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ पोस्ट शेअर केली. त्यानंतर त्यांची हत्या करण्यात आली होती. हे प्रकरणही उदयपूर हत्याकांड सारखेच असल्याचे सांगितले जात आहे. राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) या दोन्ही प्रकरणांचा तपास करत आहे. या प्रकरणाची सुनावणी जलदगती न्यायालयात करण्याची मागणी मृत उमेश कोल्हे याचा भाऊ महेश कोल्हे यांनी केली आहे. दोषींना जास्तीत जास्त शिक्षा झाली पाहिजे, असे ते म्हणाले.
याप्रकरणी सात जणांना अटक करण्यात आली आहे. महेश कोल्हे यांनी आरोपी युसूफ खानबाबत मोठी गोष्ट सांगितली आहे. २००६ पासून युसूफ हा त्याच्या भावाचा “चांगला मित्र” होता. कोल्हे यांच्या अंत्यदर्शनालाही तो पोहोचला होता. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना महेश म्हणाले की, या प्रकरणातील मास्टरमाइंडला अटक करण्यात आली आहे. त्यामुळे तपास पुढे जाईल असे म्हणता येईल. यामध्ये सहभागी असलेल्या इतरांनाही लवकरच अटक होण्याची शक्यता आहे.
युसूफ खानने उमेश कोल्हे यांची सोशल मीडिया पोस्ट व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये शेअर केली होती. आरोपी इरफान शेख हाही याच ग्रुपमधील होता. २१ जून रोजी रात्री उमेश कोल्हे यांनी त्यांचे मेडिकल दुकान बंद केले आणि ते स्कूटरवरून घरी परतत होते. वाटेत दुचाकीवरून आलेल्या तिघांनी त्यांना अडविले आणि त्यांची हत्या केली. त्यांचा मुलगा आणि पत्नीही दुसऱ्या दुचाकीवर एकत्र होते. मात्र कोल्हे यांचे प्राण वाचविण्यात त्यांना यश आले नाही.
याप्रकरणी मुदस्सीर अहमद, शाहरुख पठाण, अब्दुल तौफिक शेख, शोएब खान आणि अतिक रशीद यांच्यासह सात जणांना अटक करण्यात आली आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. रविवारी अमरावती येथे पोलिस अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला.
Amravati Murder case Investigation Police NIA Udaipur Connection