नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अमरावतीत साकार होणारा पीएम मित्रा मेगा टेक्सटाइल्स पार्क तेथील वस्त्रोद्योग क्षेत्राला खऱ्या अर्थाने बूस्ट देणारा ठरणार आहे. या पार्कच्या माध्यमातून येथील वस्त्रोद्योगाची भरभराट होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत असताना हा प्रकल्प अमरावती जिल्ह्यासाठी गेमचेंजर ठरणार आहे.
भारताच्या कापड व्यवसाय क्षेत्राला चालना देण्यासाठी सात राज्यांत उभारण्यात येणार असलेली वस्त्रोद्योग उद्याने ही पाच ‘एफ’ (फॉर्म टू फायबर टू फॅक्टरी टू फॅशन टू फॉरेन) या संकल्पनेवर आधारित आहेत. या सात महाएकात्मिक वस्त्रोद्योग क्षेत्र व परिधान उद्यानांची स्थापना विविध इच्छुक राज्यांमधील ‘ग्रीन फील्ड’ (पूर्णतः नव्याने) आणि ‘ब्राऊन फील्ड’ (अंशतः सुविधांचा महाविस्तार) क्षेत्रात केली जाणार आहे.
पीएम मित्र उद्यानात इन्क्युबेशन केंद्र, प्लग अँड प्ले, उद्योगांसाठी विकसित जागा, वीज, रस्ते, पाणी पुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन, सीईटीपी यासारख्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधा राहणार आहेत. जागतिक कापड बाजारात स्वत:चे स्थान मजबूत करणे, गुंतवणूक आकर्षित करणे आणि रोजगार निर्मितीला चालना देणे यासाठी केंद्र सरकारने ‘पीएम-मित्र’ योजनेअंतर्गत देशात सात ठिकाणी ‘मेगा इंटिग्रेटेड टेक्स्टाईल रिजन अँड अॅपेरल पार्क’ उभारण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी सात वर्षांमध्ये ४ हजार ४४५ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.
पीपीपी तत्वावर होणार विकास
पीए मित्रा मेगा टेक्सटाइल्स पार्कचा विकास ‘पीपीपी मॉडेल’नुसार करण्यात येणार आहे. त्याद्वारे ७० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे तब्बल २० लाख रोजगार याद्वारे निर्माण होतील, असा दावा करण्यात आला आहे.
Amravati Mega Textile Park PM Mitra Scheme