अमरावती (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने दमदार यश पटकावल्यानंतर अमरावती येथील बाजार समितीच्या निवडणुकीतही धक्कादायक निकाल पुढे आला आहे. याठिकाणी काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांनी रवी राणा यांच्या पॅनलचा सपशेल पराभव केला आहे.
राज्यात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. कारण ही निवडणुक म्हणजे विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम आहे, असे मानले जात होते. त्यानुसार अनेक ठिकाणी दिग्गजांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न निर्माण झाला होता. अनके ठिकाणी अनपेक्षित युती झाल्या, तर काही ठिकाणी दोन दिग्गज नेते आमनेसामने उभे ठाकले होते.
बहुतांश प्रमाणात महाविकास आघाडी किंवा आघाडी प्रणित पॅनलने घवघवीत यश संपादन केले आहे. यात अमरावती येथील बाजार समितीच्या निवडणुकीकडेही विशेष लक्ष लागले होते. याठिकाणी सहा बाजार समितीत्यांसाठी मतदान झाले होते. त्यातील अमरावती वगळता जिल्ह्यातील इतर पाचही समित्यांवर महाविकास आघाडीने एकतर्फी विजय प्राप्त केला आहे. त्यामुळे जल्लोष सुरू झाला होता. त्याचवेळी अमरावती येथील निकाल हाती आल्यानंतर अमरावती जिल्ह्यातच महाविकास आघाडीच्या घवघवीत यशावर शिक्कामोर्तब झाले.
सर्व जागांवर विजय
अमरावती येथे यशोमती ठाकूर यांच्या पॅनलने सर्व १८ जागांवर विजय संपादन करून रवी राणा यांच्या पॅनलचा दारूण पराभव केला आहे. आमदार रवी राणा यांचे भाऊ सुनील राणा निवडणुकीत उभे असल्याने त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. पण एकही जागा जिंकता न आल्याने राणा गटाला मोठा धक्का बसला आहे.
काँग्रेसचा जल्लोष
अमरावती येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेसने एकतर्फी विजय प्राप्त केल्यानंतर जोरदार जल्लोष करण्यात आला. काँग्रेसचे कार्यकर्ते गुलाल उधळून व मिठाई वाटून जल्लोष करताना दिसत होते. गेल्या दोन वर्षांत खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी राज्य पातळीवर माहोल केल्यामुळे या निवडणुकीतील विजय सहज मानला जात होता. परंतु, प्रत्यक्षात स्थानिक पातळीवर त्यांचा काहीही प्रभाव जाणवला नाही.
https://twitter.com/airnews_nagpur/status/1652266627390373890?s=20
Amravati APMC Election Politics MLA Ravi Rana Yashomati Thakur