मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बृहन्मुंबई महापालिका महानायक अमिताभ बच्चन यांच्या जुहू येथील प्रतीक्षा बंगल्याची भिंत हटविण्यास विलंब करत आहे, असे म्हणत महाराष्ट्राचे लोकायुक्त न्यायमूर्ती व्ही. एम. कानडे यांनी महापालिकेला फटकारले आहे.
रस्ता रूंदीकरणासाठी ठेकेदाराची नियुक्ती न केल्याने प्रतीक्षा बंगल्याच्या आतील भूखंडाचा भाग ताब्यात घेतला नाही, असे स्पष्टीकरण महापालिकेने गेल्या महिन्यात दिले होते. पुढील आर्थिक वर्षात यासाठी ठेकेदार नियुक्त केल्यानंतर महापालिकेतर्फे बंगल्याची भिंत हटवून भूसंपादन करण्यात येईल, असे महापालिकेने सांगितले होते.
आपल्या आदेशात न्यायमूर्ती कानडे म्हणाले, की भिंत न हटविण्याचे महापालिकेने सांगितलेले कारण योग्य दिसत नाही. जेव्हा कधी रस्ता रूंदीकरणाचे काम सुरू होते, तेव्हा महापालिकेकडून यासाठी पुरेशा आर्थिक निधीची तरतूद केली जाते. महापालिका काहीतरी मूर्ख कारण सांगून संरक्षक भिंत हटविण्यास विलंब करत आहे. ३० मे नंतर पावसाळ्यात कोणतेही तोडफोडीचे काम केले जात नाही हे जगजाहीर आहे. त्यामुळे या कामात आणखी किमान एका वर्षाचा विलंब होईल.
अमिताभ बच्चन यांच्या प्रतिक्षा बंगल्यापासून ते इस्कॉन मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर वाहतूक कमी करण्यासाठी २०१७ पासून प्रयत्न केले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून जुहूमधील लिंकिंग रोडवरील प्रतिक्षाच्या जमिनीचा काही भाग देण्यास सांगण्यात आले होते. त्या भागावर महापालिका संत ज्ञानेश्वर रोडचे रूंदीकरण करणार आहे.