मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सेवा नियमांचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली बॉलिवूड अभिनेते महानायक अमिताभ बच्चन यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. जितेंद्र शिंदे असे पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. ते अमिताभ यांच्या सुरक्षेसाठी तैनात होते, नंतर त्यांना २०२१ मध्ये मुंबईच्या डीबी मार पोलिस ठाण्यात तैनात करण्यात आले. त्यांच्याविरुद्ध विभागीय चौकशी लावण्यात आली आहे. एका पोलिस अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, जितेंद्र शिंदे यांनी नियमांचे उल्लंघन करून जवळपास चार वेळा परदेश दौरे केले आहेत. ते न सांगता दुबई आणि सिंगापूरला जाऊन आले आहे. नियमांनुसार परदेश दौरा करण्यासाठी कर्मचाऱ्याला आपल्या वरिष्ठांची परवानगी घेणे आवश्यक आहे.
अतिरिक्त पोलिस आयुक्त (दक्षिण) दिलीप सावंत यांच्या अध्यक्षतेखाली एक चौकशी समिती गठित करण्यात आली आहे. ही समिती या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करणार आहे. शिंदे हा वर्षाकाठी तब्बल दीड कोटी रुपये कमावत असल्याचे सांगितले आहे. शिंदे यांनी आपल्या पत्नीच्या नावावर सुरक्षा संस्था उघडली असून, ही संस्था अमिताभ बच्चन यांच्या कुटुंबीयांना सुरक्षा पुरवण्याचे काम करते, असे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले आहे. या प्रकरणाच्या चौकशीत असे कळाले की, या संस्थेचा संपूर्ण पैसे शिंदे यांच्या पत्नीच्या नव्हे, तर शिंदे यांच्याच खात्यातच जमा होत होते. शिंदे यांनी नुकतीच मालमत्तासुद्धा खरेदी केली होती. २०१५ ते ऑगस्ट २०२१ पर्यंत शिंदे हे अमिताभ यांच्या सुरक्षेसाठी तैनात होते. त्यांचे वार्षिक उत्पन्न १.५ कोटी रुपये होते, असे बोलले जात आहे. अमिताभ बच्चन यांना एक्स श्रेणीतील सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात येते. या श्रेणीमध्ये ४ पोलिस हवालदार लावले जातात. दोन-दोन हवालदार दोन वेगळ्या शिफ्टमध्ये तैनात असतात.