जम्मू – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सध्या जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत. केंद्रशासित प्रदेशाच्या हिवाळी राजधानीत म्हणजे जम्मूत त्यांनी विविध ठिकाणांना भेटी दिल्या. रविवारी रात्री त्यांनी आरएसपुरा सेक्टरमधील भारत-पाकिस्तान सीमेवर भेट दिली. त्यांनी तेथील स्थानिक नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. विशेष म्हणजे, एका नागरिकाच्या मोबाईलमध्ये अमित शहा यांनी स्वतः त्यांचा मोबाईल नंबर सेव्ह करुन दिला तसेच, त्या नागरिकाचाही मोबाईल नंबर अमित शहा यांनी घेतला. जेव्हा आवश्यक असेल तेव्हा थेट मला फोन करा, अशी विनंती शहा यांनी या नागरिकांना केली. हा सारा नजारा पाहून त्या नागरिकांसह सर्वच अचंबित झाले.
जम्मूला लागून असलेल्या मकवालमध्ये त्यांनी बीएसएफच्या चौकीवर जाऊन सैनिकांशी संवाद साधला आणि येथील स्थानिक नागरिकांसोबत चहापान देखील केले. यादरम्यान गृहमंत्र्यांनी मकवाल येथील एका स्थानिक नागरिकाचा फोन नंबर त्यांच्या मोबाईलमध्ये सेव्ह केला. एवढेच नाही तर गृहमंत्र्यांनी त्या नागरिकाला शहा यांनी आपला फोन नंबरही दिला. तसेच त्याला सांगितले की, जेव्हा आवश्यक वाटेल तेव्हा तुम्ही मला कॉल करू शकता.
अमित शहा यांनीही या ठिकाणी चहा घेताना बराच वेळ कॉटवर बसून अगदी आरामात गप्पा देखील मारल्या. तत्पूर्वी, जम्मूच्या भगवती नगरमध्ये एका जाहीर सभेला संबोधित करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, जम्मू -काश्मीरमधून दहशतवाद नष्ट करणे आणि नागरिकांच्या हत्या थांबवणे हे सरकारचे ध्येय आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हृदयात स्थान असलेल्या या केंद्रशासित प्रदेशात कोणालाही शांतता आणि विकासात बाधा आणू दिली जाणार नाही.
शहा पुढे म्हणाले की, केंद्र सरकारने जम्मू आणि काश्मीरमध्ये 12,000 कोटी रुपयांची गुंतवणूक आधीच केली आहे. आता 2022 च्या अखेरीस एकूण 51,000 कोटी रुपयांची गुंतवणूक आणण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे, त्यामुळे स्थानिक तरुणांना पाच लाख रोजगार उपलब्ध होतील. दि. 5 ऑगस्ट, 2019 रोजी राज्याचा विशेष दर्जा संपवून त्याचे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन करण्याच्या केंद्राच्या निर्णयानंतर गृहमंत्री शहा प्रथमच जम्मू -काश्मीरमध्ये आले आहेत. बघा व्हिडिओ
https://twitter.com/ANI/status/1452290342338838533