पुणे – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज येथील भाजप बुथ प्रमुखांच्या मेळाव्यात महाविकास आघाडी सरकारची यथेच्छ धुलाई केली. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशा तीन पक्षांनी बनलेले हे सरकार खरोखरच आहे का, असा सवालही त्यांनी केला. तसेच, त्यांनी त्यांच्या भाषणात शिवसेनेला सर्वाधिक लक्ष्य केले.
अमित शाह म्हणाले की, भाजपसाठी डीबीटीचा अर्थ आहे की ‘डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर’ म्हणजेच लाभार्थ्यांच्या थेट खात्यात पैसे जमा करणे. मात्र, महाविकास आघाडी सरकारचा डीबीटीचा अर्थ वेगळा आहे. तो म्हणजे, D- डीलर,
B- ब्रोकर आणि T- ट्रांसफर में कट मनी. यातील D हा काँग्रेसचा, ब्रोकरचा B शिवसेनेचा आणि ट्रान्सफर चा T हा राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे, असे म्हणत शाह यांनी चांगलीच टीका केली.
तसेच, शाह म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात पेट्रोल आणि डिझेल स्वस्त करण्यासाठी कर कमी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने पेट्रोल आणि डिझेल स्वस्त करण्याऐवजी दारु स्वस्त केली आहे. यातूनच सर्व काही स्पष्ट होते, अशी टीका शाह यांनी केली.
मोदी जी ने पूरे देश में टैक्स घटाकर पेट्रोल व डीजल सस्ता करने का काम किया लेकिन ये महाराष्ट्र की अघाड़ी सरकार की समझ देखिए इन्होने पेट्रोल डीजल की जगह शराब सस्ती कर दी… pic.twitter.com/pwkM0ez4ja
— Amit Shah (Modi Ka Parivar) (@AmitShah) December 19, 2021
शाह म्हणाले की, लोकमान्य टिळकांनी सांगितले की, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. मात्र, शिवसेना म्हणते की सत्ता हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. तो मी कशाही प्रकारे मिळविणारच. तसेच, कोरोना संकटाबाबत शाह म्हणाले की, कोरोना महामारीच्या संकटात मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार देशात आरोग्य व्यवस्था देत होती. त्याची चिंता करीत होती. मात्र, महाराष्ट्र जनता अक्षरशः सरकारला शोधत होती आणि ते मात्र सापडलेच नाही, असा हल्लाबोल शाह यांनी यावेळी केला.