सुदर्शन सारडा, ओझर
नाशिक – बुधवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह इतर मंत्र्यांचा व हेविवेट नेत्यांचा नियोजित नाशिक दौरा संपन्न झाला. दुपारी ओझर विमानतळ येथे आगमन झालेल्या अमित शहा व इतर मंत्र्यांनी विमानतळापासून मोटारीने नाशिक येथे कार्यक्रमास हजेरी लावली. परंतु मुंबई आग्रा महामार्गावर ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांचा सामना मंत्री महोदयांना करावा लागल्याने महामार्ग प्राधिकरणचे ढिसाळ नियोजन पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे.
अनेक दिवसांपासून दहावा मैल, मनुदेवी, जकात नाका आदी ठिकाणी दरवर्षी खड्डे पडतात अन् काही दिवसांनी महामार्ग प्राधिकरण डागडुजी करते. दोन तीन दिवस खड्डेमुक्त दिसणारे दहावा मैल सारखे कित्येक ठिकाण पुन्हा एकदा खोल खड्ड्यात गेल्याने वाहनधारकांनी यापूर्वीही उघड नाराजी व्यक्त केली. बुधवारी गृहमंत्री अमित शहा ,उपमुख्मंत्री देवेंद्र फडणवीस, दादा भुसे, आदींसह मंत्री नाशकात डेरे दाखल झाले निदान त्यांच्या दौऱ्याच्या नियोजनात खोल खड्ड्यांचा गंभीर मुद्दा साफ होईल असे अभिप्रेत असताना प्राधिकरणाने याकडे साफ कानाडोळा केल्याचे दिसले.
अपघाताच्या केंद्रबिंदूला पोलिसांचे कवच!
ज्या दहाव्या मैल, जकात नाका, आंबेहील वरील समस्येने हजारो लहान मोठे वाहन धारक त्रस्त असताना येथे दररोज छोटे मोठे अपघात होत असतात परंतु बुधवारच्या व्हीआयपी दौऱ्यात मात्र जिल्हा प्रशासन आणि महामार्ग प्राधिकरण यांच्यातील संभाषणाचा अभाव स्पष्ट दिसून आला.खड्ड्यांच्या ठिकाणी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात होता. दोन दिवसांपासून पडत असलेला पाऊस आणि खड्ड्यात साचलेल्या पाणी उडण्याच्या त्रासाला पोलिसांना देखील सामोरे जावे लागले.यामुळे पोलिसांनी सर्व्हिस रोड वर थांबणे पसंत केले.तर याच रस्त्याने जाणाऱ्या गृहमंत्र्यांच्या हाय व्होल्टेज ताफ्याला देखील स्लो टच मिळाल्याने आता तरी सामन्यांची काळजी घेतली जाईल का हा प्रमुख प्रश्न कायम आहे. टोलच्या दराचा विचार केल्यास महामार्गाचा दर्जा अतिशय खराब आहे.दररोजच्या लाखो रुपयांच्या टोल वसुलीला त्या मापातला रस्ता नाही.अतिशय सुमार दर्जा लाभलेल्या या महामार्गाच्या टोलचे दर पाहिल्यास भल्याभल्यांची पाचावर धारण बसते पण त्या बदल्यात मोठे खड्डे अन त्रास वाहनधारकांना बसत असतो. बुधवारी याचा फटका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापासून सर्वच नेत्यांना बसला.
प्रकल्प संचालकांचा मोबाईल नॉट रीचेबल
महामार्गावरील ज्या काही अपघात ठिकाणी कायमची उपायोजना करणे क्रमप्राप्त असताना पहिल्या सत्राच्या पावसानंतर वर वर मुरूम टाकून ते खड्डे दाबण्यात आले.परंतु तीन दिवसांपासून पडत असलेल्या पावसाने पुन्हा जैसे थे परिस्थितीत निर्माण झाल्याने चार ते पाच दुचाकीस्वारांचा अपघात देखील येथे झाला प्रकल्प संचालक भाऊसाहेब साळुंके यांना सदर विषयी संपर्क केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.