नवी दिल्ली – गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या गाठीभेटीच्या सत्रांनी आता वेग घेतला असल्याची बाब समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय गृहमंत्री शरद पवार यांच्यात आज भेट झाली. तर, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. त्यामुळे राजधानी दिल्लीतील राजकीय वातावरण तापल्याचे दिसून येत आहे. दोन्ही भेटी वेगवेगळ्या असल्या तरी त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.
शरद पवार यांनी गेल्या महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या. त्यास काही दिवस उलटत नाही तोच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पवार यांची दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. हे सारे थांबत नसताना आता पवार आणि शहा यांची भेट झाली आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना चांगलेच उधाण आले आहे. शहा यांच्या कार्यालयात ही भेट झाली. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात सहकार हे नवे खाते सुरू करण्यात आले आहे. त्याची धुरा शहा यांच्याकडे आहे. आणि याच खात्यासंदर्भात पवार आणि शहा यांच्यात भेट व चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. केंद्रात सहकार खाते निर्माण झाल्याने अनेक राज्यांवर त्याचा परिणाम होणार असल्याचे बोलले जात आहे. खासकरुन संपूर्ण देशात सहकार चळवळ ही महाराष्ट्रातच निर्माण झाली आणि महाराष्ट्रातच ती सर्वाधिक मोठी व भक्कम आहे. केंद्राच्या या खात्याचा महाराष्ट्राच्या आर्थिक व राजकीय क्षेत्रावर मोठा परिणाम होणार असल्याच्या शक्यता वर्तविल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर पवार-शहा यांची भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
https://twitter.com/PawarSpeaks/status/1422518225607168001